पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात शुभमन गिलने ११२ धावांची दमदार खेळी केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी २१२ धावांची भागिदारी रचत भारताला दमदार सुरुवात करुन दिली. मागील चार एकदिवसीय सामन्यांमध्ये शुभमनने ३ शतकं ठोकली आहेत. यापूर्वी त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले होते. तर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने २०८ धावा करत आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. (Shubman Gill Interview)
भारत आणि न्य़ूझीलंड दरम्यान वनडे मालिकेतील अंतिम सामन्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रवीड यांनी शुभमन गिलची मुलाखत घेतली. या दरम्यान द्रवीडने गिलला शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या दमदार कामगिरीचे मजेशीर कारणही सांगितले. द्रवीड यांनी सांगितले की, शुभमन गिल चांगली फलंदाजी करत होता. मात्र, तो अर्धशतक केले की बाद होत होता. त्यामुळे शुभमनचे वडिल त्याला म्हणाले की, तू अर्धशतकच झळकत राहणार आहेस? तुझ्या धावांचे वादळ येणार आहे की नाही? द्रवीड शुभमनच्या ४ एकदिवसीय सामन्यांतील कामगिरीनंतर म्हणाले, तुम्ही गेल्या महिन्यात धावांचा पाऊस पाडला आहे. तुमच्या वडिलांना याचा नक्कीच अभिमान वाटेल. (Shubman Gill Interview)
या मुलाखती दरम्यान, शुभमने प्रशिक्षक द्रवीड यांना विचारले की, तुम्ही मला गेल्या ५-६ वर्षांत पाहिले आहे. माझ्यामध्ये कोणते बदल झाले आहेत? यावर द्रवीड प्रत्युत्तर देत म्हणाले, धावा करण्याची-फलंदाजी करण्याची भूक तुमच्याकडे पूर्वीपासून आहे. मात्र, गेल्या ७-८ महिन्यांमध्ये तुमच्यामध्ये मोठा बदल झाला आहे. तो क्षेत्ररक्षण करण्यामध्ये झाला आहे. झेल पकडण्याचा तुम्ही सातत्याने सराव करत आहात आणि स्वत:मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही वनडेमध्ये रोहित आणि विराट बरोबर फलंदाजी करत आहात, ही तुमच्यासाठी चांगली बाब आहे. (Shubman Gill Interview)
गिल यावेळी बोलताना म्हणाला, विराट आणि रोहितची फलंदाजी पाहत मी मोठा झालो आहे. आता त्यांच्यासोबत फलंदाजी करताना मला फार आनंद होत आहे. अंतिम सामन्यात रोहितने ७० धावा केल्या होत्या. यानंतर डेरिल मिचेल गोलंदाजीसाठी आला होता. यावेळी रोहित मला म्हणाले, हा गोलंदाज माझी विकेट घेऊ शकतो. मात्र, मी याच्या षटकात जास्त धावा काढणार आहे. याप्रमाणे विचार केल्यास तुम्हाला पुढील षटकांमध्ये कसे खेळायचे आहे? याचा अंदाज येतो. (Shubman Gill Interview)