कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : अधिक महिन्याला 18 जुलैपासून सुरुवात होत आहे. अधिक मास विष्णू उपासकांसाठी तर यानंतरचा निज श्रावण मास हा शिवपूजकांसाठी महत्त्वाचा मानला जातो. या काळातील विशेष आहार आयुर्वेदाच्या द़ृष्टिकोनातून अत्यंत लाभदायी ठरतो. व्रतवैकल्यांचा हा श्रावण मास सर्वांच्या आवडीचा आहे.
मंगळवारपासून (१८जुलै) अधिक मास सुरू होऊन तो १६ ऑगस्ट रोजी संपणार आहे. यानंतर निज म्हणजे नियमित श्रावण १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर असा आहे. निज श्रावणात येणारे चार सोमवार हेच श्रावणी सोमवार असून त्यावेळी शिवपूजनाचे महत्त्व अधिक मानले जाते.
अधिक मासामध्ये विष्णू पूजेला अधिक महत्त्व आहे. यामुळे भगवान विष्णूंची पूजा करणारे या महिन्यात व्रतवैकल्ये करीत असतात. तर निज म्हणजे नियमित श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा केली जाते. जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही महादेवाच्या पूजेत विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, जवस वाहण्याची प्रथा आहे. हे सर्व निज श्रावणात म्हणजे २१ ऑगस्ट, २८ ऑगस्ट, ४ सप्टेंबर व ११ सप्टेंबर यादिवशी असणार आहे. विशेषत: श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तत्काळ फळ मिळते, असे मानले जाते.
निज श्रावणाला १७ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. २१ ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार व नागपंचमीचा सण आला आहे. ३० ऑगस्टला रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेचा सण राज्यभरात उत्साहात साजरा होईल. ६ सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी तर ७ सप्टेंबरला गोपाळकाला आहे. १४ सप्टेंबरला दर्श पिठोरी अमावस्येने श्रावणाची सांगता होणार आहे.
भगवान विष्णू उपासकांना अधिक किंवा मल श्रावण मास विशेष असतो. या महिन्यात विष्णूची आराधना केली जाते. तर निज श्रावणात शिवाची पूजा करण्यात येते. या दोन्ही सांप्रदायांना पूजेसाठी या महिन्यांची महती आहे. या काळात विशेष आहार घेतला जातो. आपल्या पूर्वजांनी चाली, रूढी, परंपरांमधून या आहाराला महत्त्व दिले असले तरी याचा आयुर्वेदामध्ये मोठा लाभ दिसून येतो.
– गणेश देसाई-नेर्लेकर, धर्मशास्त्र मार्गदर्शक, अंबाबाई मंदिर
हेही वाचा