भारतात जाऊन वर्ल्डकप जिंकला पाहिजे : शाहिद आफ्रिदी

भारतात जाऊन वर्ल्डकप जिंकला पाहिजे : शाहिद आफ्रिदी
Published on
Updated on

लाहोर, वृत्तसंस्था : पीसीबीचे चेअरमन नजम सेठी यांनी वर्ल्डकपवर बहिष्कार टाकण्याची भाषा बंद करावी, जर विश्वचषक स्पर्धा भारतात होत असेल तर तेथे जाऊन कप जिंकून बीसीसीआयच्या तोंडावर थप्पड मारावी, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने केली आहे.

जागतिक क्रिकेटमध्ये सध्या भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात शाब्दिक वार-पलटवार सुरू आहेत. आशिया कपच्या व्हेन्यूवरून पेटलेले हे शाब्दिक युद्ध आता काही महिन्यांत भारतात होणार्‍या वन डे वर्ल्डकपपर्यंत पोहोचले आहे. भारताने आशिया कपसाठी आपला संघ पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला आहे. तर पाकिस्तानने भारतातील वन डे वर्ल्डकपवर बहिष्कार घालण्याची भाषा केली आहे. आता या प्रकरणात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आपले नाक खुपसले आहे.

शाहिद आफ्रिदी पाकिस्तानी टीव्ही चॅनेल समा टीव्हीवर बोलताना म्हणाला की, 'नजम सेठींना ही गोष्ट समजली पाहिजे की पीसीबी चेअरमनच्या पदाचे महत्त्व काय आहे, त्यांची जबाबदारी काय आहे. त्यांनी आपली वक्तव्ये सारखी सारखी बदलण्यापासून दूर राहिले पाहिजे. त्यांनी आशिया कपच्या आयोजनाबाबत प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत फिरण्याची गरज नाही.'

आफ्रिदी पुढे म्हणाला की, 'पीसीबी चेअरमनचे मत स्पष्ट असले पाहिजे. आता वन डे वर्ल्डकपसाठी आपला संघ भारतात न पाठवणे हे समजण्यापलीकडचे आहे. जर क्रिकेट खेळले जात असेल तर आपला संघ देखील असला पाहिजे. मग ते भारतात होऊ दे नाही तर दुसरीकडे कुठेही. तुमच्या द़ृष्टीने तेथे जाऊन ट्रॉफी जिंकून परत येणे याशिवाय दुसरे काही मोठे असू शकत नाही. हे एक प्रकारे त्यांच्या चेहर्‍यावर थप्पड मारल्यासारखे होईल.'

पाकिस्तानने भारतीय संघ आशिया कप खेळण्यासाठी भारतात येणार नाही म्हटल्यावर एक हायब्रीड प्रस्ताव ठेवला होता. मात्र, भारताने त्यालाही बासनात गुंडाळले. यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पीसीबी चेअरमन नजम सेठींच्या वाचाळपणावर नाराजी व्यक्त केली आहे. आफ्रिदी म्हणाला की, पाकिस्तानने भारतात होणार्‍या वर्ल्डकपमध्ये सहभागी व्हावे आणि वर्ल्डकप जिंकून परत यावे. ही बाब भारतीय क्रिकेट बोर्डाच्या चेहर्‍यावर थप्पड बसल्यासारखी असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news