पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका दैनिकात उपनगर वार्ताहर म्हणून काम करणार्या तरुणावर हल्ला करण्यात आल्याची घटना महर्षीनगर भागात घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याची फिर्याद वार्ताहराने पोलिसांकडे दिली आहे. हर्षद कटारिया (वय 39, रा. महर्षीनगर) असे वार्ताहराचे नाव आहे. कटारिया यांच्यावर पंधरा दिवसांत दुसर्यांदा हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कटारिया शहरातील एका दैनिकात उपनगर वार्ताहर म्हणून काम करतात.
सातारा रस्त्यावरून रविवारी रात्री कटारिया घरी निघाले होते. सोसायटीच्या प्रवेशद्वारात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कटारिया यांच्या दिशेने पिस्तूल रोखून गोळीबार केला. प्रसंगावधान राखून कटारिया वाकल्याने गोळी लागली नाही, अशी फिर्याद कटारिया यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात दिली आहे.
दरम्यान, कटारिया यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा घटनास्थळी काडतुसाची पुंगळी सापडली नाही. 15 दिवसांपूर्वी कटारिया यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. कटारिया यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कटारिया यांनी उपनगरातील बेकायदा बांधकामांबाबत महापालिकेकडे तक्रार अर्ज दिले होते. कटारिया यांच्यावर झालेल्या हल्ल्या मागचे कारण अद्याप समजू शकले नाही.
हेही वाचा