राज्‍यरंग : शिवाजी पार्क राजकीय, सांस्कृतिक इतिहासाचा साक्षीदार

राज्‍यरंग : शिवाजी पार्क राजकीय, सांस्कृतिक इतिहासाचा साक्षीदार
Published on
Updated on

शिवाजी पार्कचा इतिहास शोधताना अनेक गोष्टी आपल्या समोर येतात. महिकावतीच्या बखरीत आज जो शिवाजी पार्कचा परिसर आहे, तो माहीमचाच भाग असल्याचं आढळतं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे यांनी या मैदानावर अनेक सभा गाजवल्या आहेत. अशाच एका सभेमध्ये आचार्य अत्रे यांनी या मैदानाचा उल्लेख 'शिवतीर्थ' असा केला. त्यानंतर भावनिकदृष्ट्या 'शिवतीर्थ' हे नाव मराठी मनात कोरलं गेलं. वाद आणि शिवाजी पार्क हे समीकरणही इतिहासात वारंवार दिसून येतं.

'दादर, मुंबई 28' हा पत्ता आज मुंबईचं स्टेटस सिम्बॉल आहे. या पत्त्यातल्या 28 आकड्यामधली आणखी एक गंमत म्हणजे, 28 एकरांवर पसरलेलं दादरचं शिवाजी पार्क. शिवाजी पार्कवर दसर्‍याची सभा घ्यायला नेमक्या कोणत्या शिवसेनेला परवानगी मिळणार, हा वाद नुकताच मिटलाय. शिवाजी पार्क हे मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय-सांस्कृतिक इतिहासाचा साक्षीदार असणारं मैदान आहे. शिवाजी पार्कवर ज्याची सभा ती खरी शिवसेना, असं वाटावं एवढं महत्त्व शिवाजी पार्कला का? हे समजून घ्यायला हवं. शिवसेनेच्या जन्मापासून ते बाळासाहेबांच्या अंत्यविधीपर्यंत शिवसेनेच्या इतिहासात महत्त्व असलेल्या या मैदानासाठी आजवर कायमच संघर्ष झालाय. राज ठाकरेंच्या सभांनी याच शिवाजी पार्कवरून सेनेला आव्हान दिलं; तर याच शिवाजी पार्कसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना न्यायालयात खेचलं. आज हा निकाल लागलाय; पण गर्दीची लढाई अद्याप संपलेली नाही.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला 'शिवतीर्था'वर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे; पण ऐतिहासिक फुटीनंतर शिवाजी पार्कवर किती गर्दी जमणार, हा सर्वांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. खरं तर असाच प्रश्न 1966 मध्ये शिवसेनेच्या पहिल्या दसर्‍या मेळाव्याला बाळासाहेबांसमोर होता. त्यावेळी सभेचं व्यासपीठ शिवाजी पार्कच्या टोकाला नाही, तर मधोमध बांधण्यात आलं होतं. शिवाजी पार्कचा इतिहास शोधताना असे अनेक किस्से आपल्या समोर येतात. अगदी पाठीपाठी जात राहिलो, तर आपण थेट राजा बिंबच्या महिकावतीपर्यंत जाऊन पोहोचतो. या महिकावतीच्या बखरीत आज जो शिवाजी पार्कचा परिसर आहे, तो माहीमचाच भाग असल्याचं आढळतं. अगदी प्रभादेवीचं मंदिरही माहीममध्ये असल्याचा उल्लेख या बखरीमध्ये आहे. म्हणजे, साधारणतः आजच्या प्रभादेवी मंदिरापासून माहीमपर्यंतचा हा भाग त्यावेळच्या माहीममध्ये मोडायचा. याच कारणामुळे 1925 मध्ये जेव्हा या मैदानाची जागा निश्चित करण्यात आली, तेव्हा त्याचं नाव 'माहीम पार्क' असंच ठेवण्यात आलं होतं.

माहीमचा हा परिसर पूर्वी ओसाड, वैराण असा भाग होता. या बेटाला 'बरड बेट' किंवा 'बॅरन लँड' म्हणत. 1138 मध्ये राजा प्रताप बिंब याने माहीममध्ये आपली राजधानी वसवली आणि पुढे या जागेचं भाग्य बदलत गेलं. या बिंब राजाचा महाल आज शिवाजी पार्क आहे, त्या परिसरातच कुठे तरी असावा, असं माझ्या वाचनात आहे. त्यामुळेच शिवाजी पार्कला राजा बिंब याचं नाव द्यावं, असा ठराव त्यावेळी मुंबई महापालिकेत आला होता, अशी आठवण मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक नितीन साळुंखे यांनी सांगितली.

1896-97 मध्ये आलेल्या महाभयंकर अशा प्लेगच्या साथीनंतर जेव्हा मुंबईची नवी रचना करण्याचं ठरलं, तेव्हा 1898 मध्ये बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट म्हणजे 'बीआयटी'ची स्थापना करण्यात आली. आजच्या दक्षिण मुंबईत एकवटलेली वस्ती आणि कार्यालयं, त्यावेळी भायखळ्यापर्यंत असलेल्या मुंबईच्या पलीकडे नेण्यासाठी 'बीआयटी'ने सुनियोजित शहराची पहिली योजना बनवली. त्या योजनेचं नाव होतं दादर-माटुंगा-वडाळा-सायन स्कीम. याच योजनेमधून दादरमधली हिंदू कॉलनी, पारसी कॉलनी, फाईव्ह गार्डन हा परिसर उभारण्यात आला. तसंच आजच्या दादर पूर्वेला समुद्रात भर घालून जमिनी निर्माण करण्यात आल्या. सुरुवातीला आगर, वाड्यांचा असलेला हा परिसर हळूहळू सुनियोजित पद्धतीने शहरीकरणाचा भाग बनत गेेला. त्यातून मध्ये मोकळं मैदान आणि सभोवती साधारणतः एकाच आकाराच्या इमारती असं नियोजन साकारत गेलं. मुंबईच्या इतिहासाबद्दलचे अनेक संदर्भ प्रबोधनकार ठाकरे यांच्या 'माझी जीवनगाथा' या ग्रंथात सापडतात. त्यात एकेठिकाणी प्रबोधनकार आणि आर्किटेक्ट इंजिनिअर द्वारकानाथ राजाराम ऊर्फ बाळासाहेब वैद्य यांच्यातला संवाद आहे. प्रबोधनकार त्यात बाळासाहेब वैद्य यांचा उल्लेख 'शिवाजी पार्कचे आद्य कल्पक' असा करतात. मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या या अनाम शिल्पकारांचा इतिहास नव्याने मांडणं आज गरजेचं झालंय.

ज्येष्ठ लेखिका शांता गोखले यांनी शिवाजी पार्कच्या इतिहासाबद्दल 'शिवाजी पार्क : दादर 28, हिस्ट्री, प्लेसेस, पीपल' असं इंग्रजी पुस्तक लिहिलंय. त्यात त्या म्हणतात की, 'शिवाजी पार्क परिसरात लोकांनी राहायला यावं, यासाठी तेव्हा सरकारने विशेष सवलती जाहीर केल्या होत्या. तसंच फ्लश असलेले संडास असणारी घरं ही त्याकाळात नव्यानेच या भागात बांधली गेली होती. मुळात घरात संडास असणं, हीच गोष्ट त्याकाळात मान्य होण्यासारखी नव्हती. तसंच हे संडास साफ करायला सफाई कर्मचार्‍यांना घरातून प्रवेश कसा द्यायचा? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळे अनेक घरांमध्ये संडासमध्ये जाण्यासाठी स्वतंत्र जिन्यांची व्यवस्था करण्यात आली.'

माहीम पार्कचं 'शिवाजी पार्क'

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 300 व्या जयंतीचं औचित्य साधून प्रबोधनकार ठाकरे यांनी माहीम पार्कचं नाव बदलून 'शिवाजी पार्क' ठेवावं असं सुचवलं. तेव्हा या विभागाच्या नगरसेविका होत्या अवंतिकाबाई गोखले. गांधीजींचं पहिलं मराठी चरित्र लिहिणार्‍या लेखिका अशी अवंतिकाबाई गोखले यांची ओळख. गांधीवादी विचारसरणीच्या अवंतिकाबाईंनी नाव बदलण्यासंदर्भातला ठराव महापालिकेत उचलून धरला. 10 मे 1927 रोजी हा ठराव मंजूर झाला आणि या ऐतिहासिक मैदानाचं नाव 'शिवाजी पार्क' असं झालं. यामुळे शिवाजी महाराजांचं जन्मवर्ष ही 1627 की 1630 असाही एक वाद तेव्हा इतिहासकारांमध्ये झाला होता. एकंदरीत, वाद आणि शिवाजी पार्क हे समीकरण काही आजचं नाही, हे इतिहासात वारंवार दिसून येतं. आता तर या मैदानाचं नाव फक्त शिवाजी पार्क असं नसून, 12 मार्च 2020 रोजी महापालिकेनं ठराव करून 'छत्रपती शिवाजी महाराज मैदान' असं नाव देण्यात आलंय.

संयुक्त महाराष्ट्राचा वणवा आणि शिवतीर्थ

रोखठोक भाषणं आणि शिवराळ भाषा ही काही शिवाजी पार्कच्या झाडांनी आज ऐकलेली नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या आधीपासून शिवाजी पार्कवर असल्या भाषणांची परंपरा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात तर प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी या मैदानावर अनेक सभा गाजवल्या आहेत. अशाच एका सभेमध्येे आचार्य अत्रे यांनी या मैदानाचा उल्लेख 'शिवतीर्थ' असा केला. त्यानंतर या मैदानाला भावनिकद़ृष्ट्या 'शिवतीर्थ' असं नाव मराठी मनात कोरलं गेलं. आचार्य अत्रे यांच्या सभेचे बॅनरही 'आज शिवतीर्थावर आचार्य अत्रे यांची जाहीर सभा' असे छापले जात. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर 1966 मध्ये याच शिवाजी पार्कवर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्याचं ठरवण्यात आलं. लोकवर्गणीतून हा पुतळा बसवण्यात आला. साधारणतः, हातात तलवार नसलेला, फक्त दिशा दाखवणारा शिवरायांचा हा एकमेव पुतळा असावा. या सार्‍या घटनांमुळे आज या मैदानाचं नाव काहीही असलं, तरी मराठी माणसासाठी हे 'शिवतीर्थ' जिव्हाळ्याचा विषय आहे.

शिवसेना आणि शिवाजी पार्क

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर 1960 मध्ये जो महाराष्ट्र हातात आला, त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, महाराष्ट्रात मराठी अस्मिता टिकवण्यासाठी सतत लढावं लागणार आहे. त्यातून पुढे 1966 मध्ये शिवसेनेचा जन्म झाला. शिवाजी पार्कजवळ असलेल्या प्रबोधनकारांच्या घरी शिवसेनेची स्थापना झाली असली, तरी शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यात प्रबोधनकार तिथे होते. याच मेळाव्यात त्यांनी 'मी माझा बाळ महाराष्ट्राला देत आहे,' असं जाहीरपणे सांगितलं होतं.

दरवर्षी दसर्‍याच्या दिवशी शिवसेनेचा मेळावा हे नंतर समीकरणच बनलं. एकीकडे शिवसेना वाढत होती आणि दरवर्षी सभेची गर्दीही. आजवरचे अनेक रेकॉर्ड शिवसेनेच्या दसरा मेळाव्याने मोडले. तसंच दसरा मेळाव्यातले वेगवेगळे प्रयोगही प्रचंड गाजले. 1982 च्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात तत्कालीन काँग्रेस नेते शरद पवार आणि समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांचीही भाषणं झाली होती. 2012 ला झालेल्या मेळाव्यात बाळासाहेबांना तब्येत बरी नसल्याने येता आलं नाही. तेव्हा त्यांचं व्हिडीओ रेकॉर्डेड भाषण ऐकायला शिवाजी पार्क भरलं होतं. याच सभांच्या जोरावर 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीची महाराष्ट्रात सत्ता आली. मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी हादेखील राजभवनात न होता, शिवाजी पार्कवरच झाला होता. उद्धव ठाकरे यांच्याही मुख्यमंत्रिपदाचा शपथविधीही इथंच झाला.

शिवाजी पार्कशी भावनिक नातं

या सभांचा एक परिणाम असाही झाला की, 2010 मध्येे मुंबई हायकोर्टाने शिवाजी पार्कचा परिसर सायलेंट झोन म्हणून जाहीर केला. या सायलेंट झोनच्या निर्णयावर शिवसेनेने कडाडून टीका केली. 'सामना'मधून आणि शिवसेना नेत्यांच्या विधानांनी त्यावेळी मोठी राळ उठवली. सायलेंट झोनच्या मुद्द्यावरून शिवसेनेचा दसरा मेळावा कोर्टात गेला. शेवटी अपवादात्मक निर्णय म्हणून शिवसेनेला दरवर्षी हा मेळावा घेण्यासाठी परवानगी देण्यात आली. 1995 मध्ये बाळासाहेबांच्या पत्नी आणि शिवसैनिकांच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा पुतळा याच शिवाजी पार्कवर उभारण्यात आला. तसंच, 2012 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यविधीही याच शिवाजी पार्कात करण्यात आले. गिरगाव चौपाटीवर झालेल्या लोकमान्य टिळकांच्या अंत्यविधीनंतर सार्वजनिक खुल्या जागी अंत्यविधी करण्याची परवानगी मुंबईत फक्त बाळासाहेबांच्या वेळी देण्यात आली. त्यानंतर यावर्षी 2022 मध्ये लता मंगेशकर यांच्या अंत्यविधीसाठीही पुन्हा शिवाजी पार्क वापरण्यात आले. शिवाजी पार्कचा असा अंत्यविधीसाठी वारंवार वापर होऊ नये, यासाठी माध्यमांमध्ये आणि समाजमाध्यमांमधूनही आवाज उठवण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news