चांगली बातमी ! शिवपट्टण येथे उभारणार शिवरायांचा राजवाडा

चांगली बातमी ! शिवपट्टण येथे उभारणार शिवरायांचा राजवाडा
Published on
Updated on

खडकवासला : किल्ले राजगडाच्या पायथ्याच्या पाल खुर्द (ता. वेल्हे) येथील शिवपट्टण परिसरात उत्खननात सापडलेल्या भव्य राजवाड्याची शिवकालीन बांधकाम शैलीत पुन्हा उभारणी करण्यात येणार आहे. हा वाडा छत्रपती शिवरायांच्या काळात उभारण्यात आला होता. तसेच शिवकालीन भांडी, नाणी आदींसह ऐतिहासिक वस्तूंचे भव्य संग्रहालय उभारण्यात येणार आहे. गुंजवणी नदीतीरावर महाराणी सईबाई यांच्या स्मृतिस्थळाची उभारणी करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

शिवरायांचा वारसा जतन करण्यासाठी पुरातत्व खात्याने वेगाने कार्यवाही सुरू केली आहे. राजवाडा, स्मृतिस्थळ, संग्रहालय आदी वास्तूंची उभारणी करण्यासाठी तज्ज्ञ वास्तुविशाराची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवपट्टण परिसराच्या विकासाबाबत पुरातत्व खात्याच्या वतीने प्रकल्प विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. शिवपट्टण येथे आधुनिक काळाप्रमाणे स्वच्छतागृह, उत्कृष्ट बांधकामशैली उजेडात आली आहे. शिवरायांचा मोठा वारसा प्रथमच मोठ्या प्रमाणात समोर आल्याने पुरातत्व खात्यासह पुरात्वतीय संशोधक, इतिहास अभ्यासकही आश्चर्यचकित झाले आहेत.

शिवरायांच्या कार्याचा ठेवा
1648 ते 1672 पर्यंत राजगडावर हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी होती. या कालावधीत शिवरायांचे राजगडावर राजपरिवारासह वास्तव्य होते. शिवरायांचे थोरले पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे बालपण, धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म, शिवरायांच्या पत्नी सईबाई यांचे निधन, आर्ग्याच्या कैदेतून सुखरूप आगमन आदी घटनांचा साक्षीदार असलेल्या राजगड व परिसरात शिवरायांच्या कार्याचा मोठा ठेवा असल्याचे शिवपट्टण परिसरातील उत्खननातून अधोरेखित झाले आहे. परकीयांच्या तसेच ऐतिहासिक कागदपत्रात शिवपट्टण स्थळाचा उल्लेख आहे.

उत्खननात सापडलेल्या वास्तूंच्या मूळ चौथर्‍यावर शिवकालीन बांधकाम शैलीत शिवरायांच्या राजवाड्याची व इतर वास्तूंची उभारणी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तज्ज्ञ वास्तुविशारदांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी प्रकल्प विकास आराखडा तयार केला जात आहे. तो लवकरच जिल्हाधिकार्‍यांना सादर केला जाणार आहे.
                                 डॉ. विलास वाहणे, सहसंचालक, पुरातत्व खाते, पुणे विभाग.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news