मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांच्या मालमत्ता ईडीने जप्त केल्या असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केवळ आपलेच गार्हाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडायला नको होते, असा सूर शिवसेनेच्या आमदारांनी आता लावला आहे.
पत्रा चाळ गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊत यांच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणताच संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याकडे व्यक्तिश: मदत मागितली. त्यामुळे पवार यांनीही मोदींची भेट घेऊन राऊत यांच्यासाठी रदबदली केली, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
शिवसेनेच्या मागे ईडीचा ससेमिरा कालपरवाचा नाही.याआधी परिवहन मंत्री अनिल परब, वाशिमच्या खासदार भावना गवळी, माजी खासदार आनंद अडसूळ, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती यशवंत जाधव, आमदार प्रताप सरनाईक यांच्या मालमत्तांवर ईडीने आतापर्यंत टाच आणली. सगळ्यात खळबळजनक कारवाई ठरली ती सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याविरोधातली.
ठाकरेंच्या मेहुण्याचीच मालमत्ता जप्त झाल्यानंतरही शरद पवार यांची मदत मागण्यात आली नव्हती. सेनेच्या सर्वच ईडीग्रस्त नेत्यांनी आपले गार्हाणे मांडले ते उद्धव ठाकरे यांच्याकडेच. असे असताना राऊत यांनी शरद पवार यांची मदत मागायला नको होती, असा शिवसेना आमदारांचा सूर आहे. ईडीच्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत ही नाराजी व्यक्त झाली.
मुख्यमंत्र्यांची भूमिका काय?
संजय राऊत यांनी गेल्या महिन्यात शिवसेना भवनात गाजावाजा करत पत्रकार परिषद घेतली. आपण मुख्यमंत्र्यांना भाजप नेत्यांविरोधात पुरावे देत आहोत, त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या आरोपांवर कोणतीही कारवाई केली नाही. यावरून मुख्यमंत्र्यांची राऊत यांच्याबद्दल भूमिका काय आहे हे लक्षात घ्या, असे सूचक विधान या बैठकीत सहभागी झालेल्या काही आमदारांनी केले.
राष्ट्रवादीबद्दल तक्रारी
वर्षावर झालेल्या आमदारांच्या बैठकीत शिवसेनेच्या पक्षबांधणीबद्दल आणि वाढीबद्दलही चर्चा झाली. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष सत्तेची मजा लुटत आहेत. आपली सत्ता असतानाही पक्षवाढीसाठी काही फायदा होत नाही, अशी कैफियत आमदारांनी मांडली.काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांबद्दलही तक्रारी केल्या. जेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करून शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे त्या मतदारसंघात शिवसेनेच्या आमदारांची कोंडी केली जात असल्याचे या आमदारांनी सांगितले.
भाजप आणि मनसेच्या संभाव्य युतीबाबत या बैठकीत चर्चा झाली असून मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक असे मनसेची ताकद असलेल्या ठिकाणी लक्ष द्यावे लागेल, असे आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे समजते.