सरूड; पुढारी वृत्तसेवा : आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय देताना पक्षपातीपणाचा कळस गाठणाऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाचे निर्देश पायदळी तुडविलेच, शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा घोर अपमान केल्याचा घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी केला. राजकीय स्वार्थासाठी संविधानिक पदाचा गैरवापर करून बेकायदा निर्णय देऊन चुकीचा पायंडा पाडल्याबद्दल नार्वेकरांचा सरूडकर यांनी जाहीर निषेधही नोंदवला. (Shiv Sena MLA disqualification)
शिवसेना आमदार अपत्रता प्रकरणाचा न्यायनिवाडा बुधवारी (ता.10) झाला. यामध्ये जाणीवपूर्वक अन्याय झाल्याची तीव्र भावना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वर्तुळात पसरली. याच अनुषंगाने शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांनीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे टीका केली आहे. (Shiv Sena MLA disqualification)
पक्षांतराचा मोठा अनुभव गाठीशी असलेल्या नार्वेकरांकडून अनपेक्षित निकालाची अपेक्षा नव्हतीच. उलट शिवसेना संपविण्याचे षडयंत्र रचणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या हातचे ते कळसूत्री बाहुले ठरल्याने निषेध करावा तितका कमीच आहे. घटनेची पायमल्ली करणाऱ्या निकालाचा महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर आगामी काळात विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे लोकशाही जिवंत राहणे, हेच मोठे आव्हान असणार आहे.
या कृतीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेची राजकीय स्वार्थासाठी कुठलाही पक्ष हवीतशी मोडतोड आणि बदल करण्याच्या प्रवृतीला बळ मिळणार आहे. भविष्यात आपल्या देशामध्ये कायद्याचे महत्व आणि अस्तित्व टिकणार नाही. विधानसभा, लोकसभा या कायदेमंडळांसह निवडणूक आयोग, न्याय व्यवस्था या स्वायत्त संस्थांचा गैरवापर करण्याची प्रथा रूढ होण्याचा मोठा धोका असल्याचे भाकीतही सरूडकरांनी वर्तविले आहे.
पक्षपाती निकालाच्या घटनेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमी, शिवसैनिक व समविचारी घटक आदींनी जाहीर निषेध करावा, लोकशाही वाचविण्यासाठी तसेच देशात कायद्याचे राज्य पुनर्प्रस्थापित करण्यासाठी निर्धाराने लढा द्यावा, असे जनतेला आवाहन करीत 'शिवसेना संघटना आणि पक्ष ठाकरेंचा होता, आहे आणि भविष्यातही तो ठाकरेंचाच राहणार आहे. मुठभर गद्दार आणि त्यांना पाठीशी घालणारी कोणतीही महाशक्ती बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरें यांच्यापासून शिवसेनेला हिरावून घेऊ शकत नाहीत.' असा ठाम आशावादही सत्यजित पाटील-सरूडकर यांनी प्रसिद्धीपत्रकात व्यक्त केला.
हेही वाचा :