नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी सोमवारी नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान खोतकर यांचे कट्टर विरोधक केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील उपस्थित असल्याने राजकीय चर्चांना पेव फुटले आहे. गेल्या काही दिवसांपासून खोतकर हे बंडखोर शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशात शिंदे-खोतकर यांच्या दिल्ली भेटीमुळे खोतकर शिंदे गटाच्या मार्गावर आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान,वैयक्तिक कामासाठी दिल्लीला आलो असून मागील वेळेस तसेच या वेळी देखील योगायोगाने मुख्यमंत्र्यांशी भेट झाली.पंरतु, एकनाथ शिंदे गटात गेलेलो नाही. मी शिवसैनिक असून शिवसेना प्रमुखांशी एकनिष्ठ आहे,अशी प्रतिक्रिया खोतकर यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत भेट घेतांना सर्व खासदारांसह रावसाहेब दानवेही उपस्थित होते,असे खोतकर म्हणाले.
या भेटीदरम्यान मात्र मराठवड्यातील दानवे-खोतकर यांच्यातील राजकीय संघर्ष मिटण्याची चिन्हे आहेत.मुख्यमंत्री दिल्लीत तसेच महाराष्ट्रात असताना त्यांच्याशी सतत भेट होत असते. आजच्या भेटी दरम्यान खोतकर आणि मला त्यांनी एकत्र बसवले. त्यांनी मागचे सर्व विसरून जाण्यास सांगत पुन्हा एकत्र काम करण्यास सांगितले असून आम्ही एकत्रित काम करणार आहे,अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी दिलेली सूचना मी तसेच खोतकरांनी मान्य केली असल्याचे देखील ते म्हणाले.
मराठवाडा भाजपा आणि शिवसेना युतीच्या पाठीमागे राहत आला आहे,पुढेही राहिल. आम्ही सगळे सोबत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवायची, ईडी कुणी मागे लावली हे प्रश्न खोतकरांना विचारा,अशी प्रतिक्रिया देखील दानवे यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना व्यक्त केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीदरम्यान दानवे, खोतकर यांच्यासह शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे, हेमंत पाटील, प्रतापराव जाधव,धैर्यशील माने,कृपाल तुमाने तसेच माजी मंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.