‘इमेजच्या नादात सरकार घालवाल, तुमच्या पीआर कंपन्यांना आवरा!’

‘इमेजच्या नादात सरकार घालवाल, तुमच्या पीआर कंपन्यांना आवरा!’
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  'इमेजच्या नादात सरकार घालवाल. तुमच्या पीआर कंपन्यांना आता आवरा', अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गुरुवारी निर्वाणीचा इशारा दिला.

शिंदे गटाने दोन जाहिराती प्रसिद्ध केल्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. गुरुवारी तिसर्‍या दिवशीही तो कायम होता. पालघरमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका व्यासपीठावर होते. मात्र तब्बल दहा मिनिटे त्यांनी एकमेकांकडे बघितलेदेखील नाही. या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकजुटीची ग्वाही दिली. मात्र, दुरावा कायम राहिला.

सह्याद्री अतिथीगृहात बंद दाराआड चर्चा

शेवटी ही कोंडी फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीच सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे चिरंजीव खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. भाजपला आणि त्यातही उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दुय्यम स्थान देणारी जाहिरात
प्रसिद्ध करण्यामागे खा. श्रीकांत शिंदे यांचेच नियोजन असल्याने त्यांना फडणवीस यांनी मुद्दामच बोलावून घेतले होते.

उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटाच्या जाहिरातींनी भाजपश्रेष्ठी कमालीचे संतप्त आहेत. ही नाराजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर मांडली. या जाहिराती पीआर टीमने दिल्या. आम्हाला त्याची कल्पना नव्हती, असा खुलासा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. फडणवीस यांनी हा खुलासा नाकारला. या जाहिरातींच्या बैठकीला कोण कोण उपस्थित होते याची मला पूर्ण माहिती आहे. तेव्हा इमेजच्या नादात सरकार घालवून बसण्यापेक्षा 2024 ला लोकसभेच्या अधिकाधिक जागा कशा येतील आणि त्यानंतर आपले सरकार पुन्हा सत्तेवर कसे येईल या दिशेने काम करा, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.

आम्ही तुमच्या इमेजला कधीही डॅमेज केले नाही. तुम्हीही आमची इमेज डॅमेज करू नका, असे सांगतानाच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या ढिसाळ कारभाराकडेही शिंदे यांचे लक्ष वेधले. भाजप आमदार सतत निधी मिळत नसल्याच्या तक्रारी करत आहेत. त्याकडेही लक्ष देण्याची सूचना फडणवीस यांनी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

कल्याणचा मुद्दा

या बैठकीत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपकडून होत असलेल्या अडवणुकीचा मुद्दा या बैठकीत उपस्थित केला. युती म्हणून काम करत असताना स्थानिक भाजप नेत्यांची भूमिका योग्य नसल्याचे फडणवीस यांच्या कानी घालण्यात आले.

अमित शहांनी भेट नाकारली

जाहिरातीवरून राज्य भाजपने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे हे बुधवारी दिल्लीत गेले होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भेट मिळाली नाही. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या मुद्द्यावर स्थानिक पातळीवर तोडगा काढण्याचा संदेश दिल्याची चर्चा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news