सातारा, पुढारी वृत्तसेवा : देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आग्रा किल्ल्यातील 'दिवान-ए-आम'मध्ये छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा पुन्हा एकदा गुंजणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासह केंद्रातील व राज्यातील मंत्री उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती देवगिरी प्रतिष्ठानचे पदाधिकारी विनोद पाटील यांनी दिली.
देशाच्या इतिहासात आग्रा येथील लाल किल्ल्याचे विशेष महत्त्व आहे. औरंगजेबासारख्या कपटी आणि कारस्थानी बादशहाने छत्रपतींना कैद करुन नजरकैदेत ठेवले. परंतु, याच ठिकाणी छत्रपतींनी गनिमी कावा करुन औरंगजेबाच्या हातावर तुरी देत सुखरुप महाराष्ट्रात येण्याचा भीमपराक्रम केला होता. पावसाळ्यात मराठ्यांच्या घोड्यांना बाहेर जागा मिळेना म्हणून आग्रा येथील ताजमहालात महादजी शिंदेंनी मराठ्यांची घोडी बांधली होती. हाच दैदिप्यमान इतिहास आग्रा येथून पुन्हा एकदा जागवायचा असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पुरातत्व खात्याने या सोहळ्याला परवानगी नाकारली होती. त्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राज्य सरकार सह आयोजक असल्याने आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मिळेल, असा निकाल कोर्टाकडून मिळवला. विनोद पाटील यांनी विनंती केल्यानंतर राज्य सरकार देखील सह आयोजकपद स्वीकारण्यास तयार झाले. त्यामुळे हा सोहळा धूमधडाक्यात साजरा होणार आहे. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, विशेष अतिथी म्हणून छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती विनोद पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली.