शिर्डी : शिंदे-ठाकरे गटातच सामना

Lok Sabha Election
Lok Sabha Election

राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघात जुनेच प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा नव्याने आमनेसामने ठाकले आहेत. शिंदे सेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे तर उबाठा सेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे एकमेकांविरोधात लोकसभेच्या मैदानात असले तरी शिर्डीचा खरा सामना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंतच रंगणार असल्याची चिन्हे आहेत. लोखंडे यांची सगळी भिस्त महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांवर आहे, तर भाऊसाहेब वाकचौरे यांना काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते यांचे बंड आणि अंतर्गत गटबाजीचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. कागदावर महाविकास आघाडी बलाढ्य वाटत असली, तरी शिर्डीतील बेरजेच्या गणितात विखे-पाटलांचा 'हातचा' प्रभावी ठरेल, हेच आजचे चित्र.

पूर्वीचा कोपरगाव आणि आताच्या शिर्डी मतदार संघावर विखे कुटुंबाचा मोठा प्रभाव आहे. स्व. बाळासाहेब विखे यांनी सात वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. स्व. भीमराव बडदे (भाजप) यांचा अपवाद सोडला, तर शिर्डी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला दिसतो. मोदी लाटेत काँग्रेस विस्कटली अन् शिर्डीतही राजकीय वर्चस्व बदल झाला. 2009 मध्ये राखीव झालेल्या शिर्डीवर शिवसेनेचे वर्चस्व आले, ते आजपर्यंत कायम राहिले. रामदास आठवले यांचा पराभव करत भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेचे शिर्डीतून पहिले खासदार झाले.

2014 च्या निवडणुकीत वाकचौरे काँग्रेसमध्ये गेले अन् निवडणूक लढले; पण त्यांना शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी लोकसभेच्या आखाड्यात चितपट करत भगवा फडकावला. पुढे वाकचौरे पक्षांतर करत भाजपवासी झाले अन् श्रीरामपूर विधानसभा लढले, तेथेही त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019 ची लोकसभा अपक्ष लढले, पण पराभूत झाले. आता ते पुन्हा स्वगृही शिवसेनेत परतले असून, उबाठा सेनेने त्यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे सेनेचे खा. सदाशिव लोखंडेंशी त्यांची लढत होत आहे. 2014 च्या निवडणुकीत लोखंडे (सेना) आणि भाऊसाहेब वाकचौरे (काँग्रेस) अशी लढत झाली होती. आता दशकानंतर पुन्हा जुनेच प्रतिस्पर्धी एकमेकांविरोधात लढत आहेत. फरक इतकाच की यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासह महसूलमंत्री विखे-पाटील यांचे पाठबळ लोखंडेमागे उभे आहे. तर वाकचौरे यांची सगळी मदार उद्धव ठाकरे यांच्याच सैन्यावर आहे.

लोकसभेच्या तोंडावर स्वगृही परतलेल्या वाकचौरे यांना ठाकरेंच्या सैन्याशी जुळून घेताना कसरत करावी लागत आहे. अशातच काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते बंडाचा झेंडा फडकावण्याच्या तयारीत आहेत. 18 एप्रिलपासून नामांकन भरण्यास सुरुवात होण्यापूर्वीच वाकचौरे यांना मनोमीलन करून घ्यावे लागेल, अन्यथा त्यांची वाट बिकट होण्याची शक्यताच अधिक. मंत्री विखे-पाटलांच्या पाठपुराव्यानंतर निळवंडे धरणाचे पाणी, शिर्डीत एमआयडीसी, विमानतळाचे विस्तारीकरण या सदाशिव लोखंडे यांच्या जमेच्या बाजू, पण लोकसंपर्काचा अभाव त्यांच्यासमोर अडचणीचा ठरू शकतो. भाऊसाहेब वाकचौरे यांचा शिवसेना-काँग्रेस-भाजप-अपक्ष अन् पुन्हा शिवसेना असा राजकीय प्रवास पाहता 2009 च्या टर्ममधील केलेली कामे हाच एकमेव जमेचा मुद्दा त्यांच्यासमोर आहे. पक्षांतर्गत धुसफुस, बंड अशा अडचणी त्यांच्यासमोर अधिक आहेत.

शिर्डी लोकसभेंतर्गत संगमनेर, कोपरगाव, अकोले, श्रीरामपूर, राहाता, नेवासा विधानसभेचे मतदारसंघ येतात. यातील संगमनेर, श्रीरामपूर काँग्रेस, तर नेवासा सेनेला पाठिंबा दिलेले शंकरराव गडाख यांचा प्रभाव आहे. अकोलेत किरण लहामटे, कोपरगावचे आशुतोष काळे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. एकमेव विखे-पाटील हे भाजपचे आमदार असले, तरी विखे पाटील यांचा प्रभाव आणि स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे हे भाजपचे माजी आमदार लोखंडे यांच्या जमेच्या बाजू आहेत.

भाऊसाहेब वाकचौरेंसमोर आव्हानेच अधिक

शिर्डीच्या जागेवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सुरुवातीला दावा ठोकला. उत्कर्षा रुपवते या काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार होत्या; पण ही जागा उबाठा सेनेला गेल्याने रुपवते बंडाच्या तयारीत आहेत. नेवाशातून गडाखांचे समर्थक अशोक गायकवाड उमेदवारी न मिळाल्याने नाराज आहेत. गायकवाडांची नाराजी अन् रुपवतेंचा बंडाचा झेंडा वाकचौरे यांना अडचणीचा ठरेल, असे आजचे चित्र आहे. काँगे्रेस आणि उबाठा सेनेतील धुसफुस आणि मंत्री विख-पाटील यांचा करिश्मा भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासमोरील आव्हाने आहेत.

मोदी लाट अन् हॅट्ट्रिक

2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीत देशभर मोदी लाट होती. त्यामुळेच सेनेचे सदाशिव लोखंडे दोनदा खासदार झाले. मुंबई निवासी झालेले लोखंडे यांना ध्यानीमनी नसताना 2014 ची लॉटरी लागली होती. अवघ्या पंधरा दिवसात ते संसदेत पोहोचले. आता मोदी यांच्या तिसर्‍या टर्मसाठी भाजप सरसावली असून, त्याच त्सुनामीवर लोखंडे यांची दिल्लीची हॅट्ट्रिक सुकर होण्याची चिन्हे आहेत. मात्र भाऊसाहेब वाकचौरे यांच्यामागे उद्धव ठाकरे यांनी उभी केलेली ताकद अन् शिवसेना फुटीनंतर प्रतिष्ठेची केलेली शिर्डीची जागा यावरच मदार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news