Ind vs Zim : ‘गब्बर’ने घातली ‘ठाकूर’ची जर्सी, शिखर-शार्दुलवरून मजेदार मीम्स व्हायरल

Ind vs Zim : ‘गब्बर’ने घातली ‘ठाकूर’ची जर्सी, शिखर-शार्दुलवरून मजेदार मीम्स व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार केएल राहुलने (K L Rahul) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिले दोन सामने जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. कर्णधार केएल राहुल आणि शिखर धवन भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आले आहेत. दरम्यान, सामन्यादरम्यान एक विशेष गोष्ट देखील पाहायला मिळाली, जेव्हा मैदानी पंच शिखर धवनच्या जर्सीवर चिकटपट्टी लावताना दिसले. (Shikhar Dhawan)

दरम्यान, या सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूंना किटबाबत अव्यवस्थेचा सामना करावा लागल्याची चर्चा आहे. त्यामुळेच शिखर धवन (Shikhar Dhawan) फलंदाजीला मैदानात उतरला तेव्हा त्याला शार्दुल ठाकूरची जर्सी परिधान कराची लागल्याचे बोलले जात आहे. वेस्ट इंडिजपासून ते झिम्बाब्वे दौऱ्यापर्यंत एका गोष्टीने भारतीय संघाला खूप त्रास दिला आहे. स्पॉन्सर योग्य वेळी आवश्यकतेनुसार संघाला किट उपलब्ध करून देऊ शकत नसल्याची कुजबुज सुरू आहे. सोमवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान शिखर धवनला शार्दुल ठाकूरची जर्सी घालून मैदानावर उतरावे लागले. शार्दुल ५४ क्रमांकाच्या जर्सीमध्ये खेळतो तर धवन ४२ क्रमांकाचा टी-शर्ट घालतो.

जर्सीशी संबंधित नियम काय आहेत?

वास्तविक प्रत्येक खेळाडूला त्यांचा वेगळा जर्सी क्रमांक दिला जातो. सामन्यादरम्यान कोणत्याही खेळाडूची जर्सी ही त्याची ओळख असते. लोक खेळाडूंना त्यांच्या जर्सी क्रमांकावरूनच ओळखतात. अशा परिस्थितीत जेव्हा एखादा खेळाडू दुसऱ्या खेळाडूची जर्सी परिधान करतो तेव्हा प्रत्येकाच्या मनात एक संभ्रम निर्माण होतो. पण्अ अशाचेळी त्या जर्सीवरील नावावर टेप चिकटवला जातो.

याआधीही अनेकदा भारतीय खेळाडू दुसऱ्या खेळाडूची जर्सी घालून मैदानात उतरलेले दिसले आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतील प्रसिद्ध कृष्णाची जर्सी घातलेला दीपक हुड्डा असो किंवा टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादव, आवेश खान-अर्शदीप सिंगची जर्सी घालून मैदानात उतरलेला असो. असाच काहीसा प्रकार भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या सामन्यातही पाहायला मिळाला. मात्र, वेगवेगळ्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी मैदानावर दुसऱ्या खेळाडूची जर्सी घालण्याचे कारण वेगळे असू शकते.

मिम्स व्हायरल…

शिखर धवनला गब्बर म्हणूनही ओळखले जाते, तर शार्दुलचे आडनाव ठाकूर आहे. यानंतर चाहत्यांनी दोन्ही खेळाडूंना शोलेच्या गब्बर आणि ठाकूरसोबत जोडून मिम्स व्हायरल केले आहेत. कुणी गब्बरने ठाकूरचे हात कापून जर्सी आणल्याचे म्हणतंय, तर कुणी वेगळ्या पद्धतीने या घटनेचा आनंद लुटत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news