बठिंडा; पुढारी ऑनलाईन : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्या प्रकरणी (Sidhu Moose Wala murder) शार्प शूटर हरकमल राणू (Sharp shooter Harkamal Ranu) याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. राणू हा ८ शार्पशूटरपैकी एक आहे. दिल्ली स्पेशल सेलने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या केलेल्या चौकशीत राणू याचे नाव समोर आले होते. या प्रकरणातील ही दहावी अटक आहे.
बठिंडाचा रहिवासी असलेल्या हरकमल राणूचे आजोबा गुरचरण सिंग चौहान यांनी सांगितले की, राणूला आपण स्वतः पोलिसांच्या ताब्यात देण्याआधी त्यांची आपण स्वतः चौकशी केली होती. राणूने म्हटले होते की पोलिसांनी जरी त्याचे नाव शार्प शूटरच्या यादीत समाविष्ट केले असले तरी हत्या प्रकरणात त्याचा हात नाही. तो जरी नशा करत असला तरी तो कोणाची हत्या करु शकत नाही. आम्ही त्याला पोलिसांसमोर हजर केले आहे. पण तो निर्दोष असल्याचे त्याच्या आजोबांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी अनेक संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्या चौकशीत नवीन माहिती समोर येत आहे. बुधवारी ताब्यात घेतलेल्या एका संशयिताच्या चौकशीत हल्लेखोर २५ मे पासून सिद्धू मुसेवाला याच्यावर हल्ला करण्यासाठी त्याच्या मागावर होते, असा खुलासा केला होता. पण सिद्धू मुसेवाला चार दिवसानंतर २९ मे रोजी समोर आल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली होती. एक दोन दिवसांत सिद्धू जर समोर आला नसता तर त्याच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करण्याची योजना हल्लेखोरांनी आखली होती, अशीही माहिती तपासातून पुढे आली आहे.
दरम्यान, सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचे (Sidhu Moose Wala murder) कनेक्शन पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि जुन्नर तालुका निघाल्याने खळबळ उडाली होती. सिद्धू मुसेवालाला गोळ्या घालणार्या लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीत आंबेगाव तालुक्यातील संतोष जाधव आणि जुन्नर तालुक्यातील सौरभ महाकाळ हे दोन कुख्यात गुन्हेगार आहेत, असे याआधी तपास यंत्रणांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईची (Gangster Lawrence Bishnoi) आज पाच दिवसांची कोठडी संपत असून त्याला आज पटियाला न्यायालयात हजर करण्यात आले.