राज्यात भाजपसोबत सत्तेत जाण्याला शरद पवारांचेच समर्थन : सुनील तटकरे

राज्यात भाजपसोबत सत्तेत जाण्याला शरद पवारांचेच समर्थन : सुनील तटकरे

कोलाड (अलिबाग) : भाजपसोबत राज्याच्या सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सहभागी होण्याच्या निर्णयात आमदार सहभागी होतेच; शिवाय खुद्द शरद पवार यांचेही या निर्णयाला समर्थन होते. म्हणूनच त्यांनी शपथविधीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्री आणि आमदारांना भेटीची वेळ दिली होती, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केला.

याबाबतचे सर्व पुरावे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आहेत, असे सांगून तटकरे यांनी ऐन लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत शरद पवार यांना संशयाच्या भोवर्‍यात उभे केले आहे.

नाशिकमधून निवडणूक लढणार नसल्याचे छगन भुजबळ यांनी जाहीर केले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा या जागेवरील दावा कायम आहे. सध्या वाटाघाटी सुरू असून तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून मार्ग काढतील, असे अनेक पोलखोलही तटकरे यांनी केले. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे निवडणूक लढवत आहेत. प्रचार आता ऐन भरात आला असताना दै. 'पुढारी'ला त्यांनी सविस्तर मुलाखत दिली. त्यांच्याशी झालेली ही प्रश्नोत्तरे :

भाजपसोबत जाण्याचा निर्णय शरद पवारांचा की अजित पवारांचा?

– भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय एका रात्रीत घेतलेला नाही. पवार यांच्या उपस्थितीत 2014 आणि 2016 मध्येही याबाबतचा निर्णय झाला होता. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत 2017 मध्ये बैठक झाली होती. बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार यांची युती आहे. या बदल्यात नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले आहे. तोच फॉर्म्युला या बैठकीमध्ये आम्ही मांडला होता. मात्र 'बालासाहब और हमारी पुरानी दोस्ती है. शिवसेना सत्ता में साथ रहेगी' अशी भूमिका शहा यांनी घेतल्यामुळे आम्ही नकार दिला. त्यानंतर 2019 मध्ये तर जागावाटप आणि खातेवाटपही ठरले होते. त्यानुसार अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामागील स्क्रिप्ट कोणाची होती, याचा आपण लवकरच भांडाफोड करू.

आता आपण महायुतीमध्ये आहात. असे असताना उमेदवारांच्या नावांची घोषणा एकत्र का झाली नाही?

– पाच टप्प्यांत निवडणुका असल्यामुळे टप्प्यानुसार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जात आहे. परस्परांमध्ये समन्वय ठेवून आम्ही उमेदवार घोषित करत आहोत.

आपल्या कोट्यातील परभणीची जागा सोडल्याबद्दल पक्षात नाराजी आहे का?

– पक्षातील ज्येष्ठ नेते आणि पदाधिकार्‍यांशी चर्चा करूनच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. निवडणुकीच्या तोंडावर असे काही निर्णय घ्यावेच लागतात. मात्र त्यांना उमेदवारी दिल्याचा फायदा राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांना होईलच. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस या पक्षांनीही अहमदनगर, वर्धा, माढा, हिंगोली येथे आयात उमेदवारांना तिकिटे दिली आहेत.

बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार अडकून पडले आहेत, असे चित्र आहे.

– हा विरोधकांचा अपप्रचार आहे. परभणी, धाराशिव, अहमदनगर, शिरूर, अमरावती, वर्धा आणि मावळ मतदारसंघात अजित पवार जाऊन आलेले आहेत. इतर मतदारसंघांतही त्यांचे दौरे आयोजित केले आहेत.

जातनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध असताना आपल्या जाहीरनाम्यात आपण जातगणनेचे आश्वासन दिले आहे, ते कसे?

– राजकीय आघाडी असताना अनेक अडचणी येत असतात. परंतु आम्ही आमची भूमिका सोडली नाही. इतकेच नाही तर आम्हाला आमची मते मांडण्याचा पूर्णतः अधिकार आहे. त्याचे हे आश्वासन एक उदाहरण समजा.

आपला प्रचार शरद पवारांच्या विरोधात असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या?

– आमचा प्रचार व्यक्तीच्या विरोधात नसून महाविकास आघाडीच्या विरोधात आहे.

शरद पवार यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे त्यांची उणीव आपल्याला या प्रचारात जाणवते का?

– राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे अनुभवी नेते आहेत. याच नेत्यांनी यापूर्वीही निवडणुकांची रणनीती आखली आहे. आमच्या पक्षाची यशाकडे वाटचाल सुरू आहे हे लोकसभा निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारापासून भाजप आणि मनसेही दूर असल्याचे दिसत आहे.

– राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक उमेदवारांच्या सभांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. आमच्या निवडणूक प्रचारासाठी राज ठाकरे यांनी स्वतः समन्वयक नेमले आहेत. त्यांच्या समन्वयकांची यादी आम्हाला मिळाली आहे. मतदारसंघातील अनेक मनसैनिक आमच्या प्रचारात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नाही, अशा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला मतदान करण्याचे आदेश अजित पवार गटाने दिले असल्याच्या चर्चा आहेत.

– हा विरोधकांचा अपप्रचार आहे. आमचे सर्व मतदार महायुतीच्या उमेदवारांनाच मतदान करतील. विरोधकांच्या मनाप्रमाणे मतदान होणार नाही. आम्हाला बदनाम करणारे लोक अशा प्रकारचा प्रचार करत आहेत. पण तो खोडसाळ प्रकार त्यांच्यावरच उलटत आहे.
भाजप सत्तेत आल्यानंतर संविधान बदलले जाईल, असाही प्रचार केला जात आहे. यामागे विरोधकांची हतबलता दिसून येत आहे. प्रचारासाठी त्यांच्याकडे मुद्दे शिल्लक राहिले नाहीत. आमच्या जाहीरनाम्यामध्ये संविधानाची प्रस्तावना प्रकाशित करून आम्ही संविधानाशी बांधील असल्याचे स्पष्ट केले आहे. विरोधकांना काहीही बोलू देत. आम्ही महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागांवर हमखास विजयी होणार आहोत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news