मुंबई : पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar News) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा आज (दि. ५) समितीने नामंजूर केला. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ही घोषणा करताच राष्ट्रवादी भवनासमोर जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशन समारंभात २ मेरोजी पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची समिती घोषित केली होती. समितीमधील नेत्यांपैकी आज १८ जणांनी या बैठकीत सहभाग घेतला होता. सकाळी ११ वाजता बैठकीला सुरुवात होताच केवळ दहा मिनिटांत एकमताने पवार (Sharad Pawar News) यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. मात्र, शरद पवार यांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत असून त्यांची सर्वानुमते पक्षाध्यक्षपदी कायम राहावे, अशी विनंती करण्यात येत आहे, अशा प्रकारचा ठराव एकमताने या बैठकीत पारीत करण्यात आला, अशी माहिती पक्षाचे उपाध्यक्ष पटेल यांनी दिली. पटेल यांची ही माहिती कार्यकर्त्यांना समजताच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
बैठकीनंतर पटेल यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आदी नेते पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानाकडे रवाना झाले.
दरम्यान, आज सकाळी १० वाजल्यापासून कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनासमोर ठिय्या दिला होता. देश का नेता कैसा हो- शरद पवार जैसा हो, पवारसाहेब राजीनामा परत घ्या, आदी घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्यामुळे पक्ष कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा