काँग्रेसचा विरोध झुगारून भिवंडीत शरद पवार गटाचा उमेदवार; सुरेश म्हात्रेंना तिकीट; बीडमधून बजरंग साेनावणे

काँग्रेसचा विरोध झुगारून भिवंडीत शरद पवार गटाचा उमेदवार; सुरेश म्हात्रेंना तिकीट; बीडमधून बजरंग साेनावणे
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भिवंडीच्या जागेबाबत काँग्रेस आग्रही असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गुरुवारी येथून सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने दुसरी यादी जाहीर करताना काँग्रेसचा येथे असलेला विरोध शरद पवार गटाने झुगारल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, सातार्‍याच्या जागेबाबत अद्याप काही निर्णय झालेला नाही. मात्र, शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा असल्याचे समजते. पवार यांच्यासोबत खा. श्रीनिवास पाटील, त्यांचे पुत्र सारंग पाटील आणि शशिकांत शिंदे यांची बैठक झाली. यात सारंग पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली. मात्र शिंदे यांनी श्रीनिवास पाटील यांनीच निवडणूक लढवावी, असे सुचवले. त्यावर उद्या (शुक्रवार) निर्णय कळवू, असे पवार यांनी सांगितले.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 30 मार्च रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये अमर काळेंना वर्धा, सुप्रिया सुळे बारामती, भास्कर भगरे दिंडोरी, अमोल कोल्हे शिरूर आणि नीलेश लंके यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. बीड जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांत यापूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. समाजवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून हा जिल्हा शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर या जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर यांचा अपवाद वगळता बहुतांश लोकप्रतिनिधी अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत.

ज्योती मेटेंच्या चर्चेला पूर्ण विराम

भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातून पवार कोणाला उमेदवारी देतील याकडे लक्ष लागले होते. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. मागील आठवड्यात मेटे यांनी शरद पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दोन वेळा भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले होते.

2019 मध्ये भाजपच्या बीड लोकसभा उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना लक्षवेधी मतदान झाले होती. मात्र ज्योती मेटे यांची बाजू भक्कम असल्याची चर्चा झाल्यामुळे सोनावणे यांचे नाव मागे पडले होते. मात्र, गुरुवारी जयंत पाटील यांनी सोनावणे यांचे नाव जाहीर करून मेटे आणि बीडकरांनाही धक्का दिला आहे.

भिवंडीचा सामना लक्षवेधी ठरणार

भिवंडीमध्ये बाळ्यामामा मात्रे यांची लढत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात होईल. पाटील हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. म्हात्रे आणि पाटील हे दोन्हीही तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे येथील सामना लक्षवेधी ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news