Income Tax dept notice to Ajit Pawar : अजित पवार यांच्यावरील कारवाई, राष्ट्रवादी काँग्रेसची जबरदस्त कोंडी

Income Tax dept notice to Ajit Pawar : अजित पवार यांच्यावरील कारवाई, राष्ट्रवादी काँग्रेसची जबरदस्त कोंडी
Published on
Updated on

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असताना आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर एकामागून एक संकट मालिका सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन ज्येष्ठ मंत्र्यांवर संक्रांत आली असून, त्यातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी रात्री अटक झाली आहे; तर उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांच्या चौदाशे कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची नोटीस आली आहे. (Income Tax dept notice to Ajit Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेसला हा जबरदस्त धक्का असून, या कारवाईने राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी झाली आहे. या कारवायांचे दूरगामी राजकीय परिणाम होणार, हे स्पष्टच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्यावर सध्याच्या संकटांचा परिणाम होणार का, अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Income Tax dept notice to Ajit Pawar : मुश्रीफही चक्रात अडकले

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटींच्या वसुलीप्रकरणी आरोप झाल्यानंतर चौकशीसाठी 'ईडी'ने नोटीस दिली. पाठोपाठ त्यांची चौकशी सुरू झाली. 'ईडी'चा ससेमिरा टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले; पण त्यात काही त्यांना दिलासा मिळाला नाही आणि अखेर त्यांना अटक झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप केले आणि मुश्रीफही चौकशीच्या चक्रात अडकले आहेत.

या दोघांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले असतानाच किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांच्यावर आरोपांची तोफ डागली. जरंडेश्वर कारखाना अजित पवार यांनी बेनामी कंपनीद्वारे ताब्यात घेतला, हा सोमय्यांचा आरोप.

त्यांच्या आरोपापाठोपाठ अजित पवारांशी संबंधितांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर आयकर खात्याचे छापे पडले आणि या छाप्यांनंतर आता अजित पवार यांच्या एक हजार चारशे कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची नोटीस जारी झाली आहे.

दिवाळीनंतर आणखी स्फोट होणार : देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्र्यांसह तीन मंत्र्यांवर झालेल्या कारवाईने राजकीय क्षेत्रात खळबळ माजणे आणि तर्कवितर्क होणे स्वाभाविकच आहे. या कारवाया होत असतानाच माजी मुख्यमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर आणखी स्फोट होणार, असा इशारा दिला आहे.

किरीट सोमय्या हेही आणखी मंत्री 'रडार'वर असल्याचे सांगत आहेत, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही त्यांच्या सुरात सूर मिसळत आहेत. त्यामुळे या सार्‍यामागे बोलविता धनी भाजपच आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने करणे स्वाभाविकच आहे. या दोन पक्षांच्या नेत्यांत सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोपांची धुळवड सुरू आहे. हे त्याचेच द्योतक म्हटले पाहिजे.

राष्ट्रवादी काँग्रेसची यातून कोंडी करावी, हा भाजपचा हेतू दिसून येतो. दोन वर्षे होत आली, तरी महाविकास आघाडीत काही बिघाडी होऊ शकली नाही.

निवडणुकीनंतर कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने त्रिशंकू अवस्था झाली होती. तेव्हा अजित पवार यांनी काही सहकार्‍यांसह भाजपशी हातमिळवणी केली होती; पण ते सरकार औटघटकेचे ठरले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. त्यातून काही फाटाफूट होईल, अशी भाजपची अपेक्षा असावी; पण ती झाली नाही. त्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केले असण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

भाजपचे डावपेच

सध्या तरी महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस पक्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष बळ अधिक आहे. ते खच्ची करावे, या हेतूने भाजपचे डावपेच असावेत, असाही तर्क केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसवर असा दबाव वाढवल्यास त्यातील काही भाजपच्या गळाला लागतील, अशीही भाजपची अपेक्षा असू 936केल, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. काहीही असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे आणि त्याचे आगामी राजकारणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news