Sharad Pawar : विश्वासघातकी राजकारण

Sharad Pawar : विश्वासघातकी राजकारण
Published on
Updated on

'महाराष्ट्र टाइम्स'चे विशेष प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार जगन फडणीस यांनी लिहिलेले 'शरद पवार – धोरणे आणि परिणाम' हे पुस्तक 1995 मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. त्यातील 'विश्वासघातकी राजकारण' या प्रकरणातील काही भाग प्रकाशक अनिल मेहता यांच्या परवानगीने या ठिकाणी देण्यात येत आहे.

-एकीकडे पवार हे पक्षाचे नेते राजीव गांधी यांच्याशी एकनिष्ठ आहोत असे शपथपूर्वक सांगत, त्याच वेळी पवार हे चंद्रशेखर पंतप्रधान व्हावेत म्हणून त्यांच्या बगलेत शिरत. यामुळे पवार यांच्या संदर्भात काँग्रेस पक्षाच्या वर्तुळात त्यांच्याविषयीच्या संशयाने भुवया उंचावत.
– काँग्रेस पक्षात फूट पाडून जनता दल व पवार गट यांच्याआधारे राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात नवी शक्ती निर्माण करण्याचा डाव यामागे आहे काय?

मुख्यमंत्री शरद पवार यांच्या राजकीय कारस्थानासंदर्भात राजीव गांधी हयात असताना 'इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया'मध्ये (डिसेंबर 1990) पवार यांच्यावर 'पवार प्ले' शीर्षकाखालील लेखाची ही सुरुवातीची चौकट आहे. राजीव गांधींची या लेखानंतर हत्या झाली आणि देशातील राजकारण बदलले. या लेखातील काही भाकिते खरी ठरली नसतील. पण पवार यांच्यासंबंधी सर्वच क्षेत्रांत त्यांची काय प्रतिमा निर्माण झालेली आहे यावर या लेखाने प्रकाश पडतो. 'अविश्वास', 'विश्वासघात' या शब्दांचा राजकारणाच्या संदर्भात उल्लेख आला की, या शब्दांच्या आधी किंवा त्याबरोबर शरद पवार यांचे नाव घेतले जाते. शालिनीताई पाटील यांनी शरद पवार यांची तुलना सूर्याजी पिसाळबरोबर केलेली होती. त्यानंतर मराठी, इंग्रजी, हिंदी व गुजराती भाषेच्या वृत्तपत्रांतून पवार यांना 'सूर्याजी पिसाळ' असे विशेषण न लावता, पण त्याच व्याख्येत बसणारी भाषा वापरून पत्रकार, अन्य नेते व काँग्रेस पक्षातील नेते याचप्रकारे शरद पवार यांचे वर्णन करू लागले आहेत. पवार यांना 'यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे आपण मोठे झालो हे आता मान्य नाही.' ते तसे बोलूनही दाखवतात, असे सांगणारी माणसे आहेत. पण 'निर्माण होणार्‍या वादात पडण्यास नको' म्हणून या लोकांनी त्यांची नावे नमूद करू नये, असे म्हटले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्याबाबतीत त्यांच्यामुळे आपण मोठे झालो नाही, असे पवार यांनी म्हणावे हा कृतघ्नपणाचा कळस झाला! यशवंतराव चव्हाण यांच्या मृत्यूनंतर पवार यांनी आपल्याला वसंतदादा पाटील यांचे सरकार यशवंतराव चव्हाण यांनी पाडण्यास सांगितले म्हणून ते आपण पाडले, असे सांगण्याचा प्रयत्न जरूर करून पाहिला. पण वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडण्याच्या घटनेत इतरांचाही सहभाग आहे. त्यातील काहीजण हयात असून ते या घटनेचे चांगले साक्षीदार आहेत; म्हणून चव्हाण यांच्या सांगण्यावरून आपण सरकार पाडले, या पवार यांच्या बहाण्यावर कोणाचा विश्वास बसला नाही. मात्र, पवार यांच्या लबाडी, बनवाबनवी व विश्वासघातकी राजकारणाविषयी खात्रीच झाली. आपल्यावर विश्वासघाताचा कलंक लागला आहे, तो पुसण्यासाठी आपण म्हणतो त्याचा इन्कार करण्यास चव्हाण हयात नाहीत; याच कारणांनी पवार यांनी चव्हाण यांच्या मृत्यूनंतर असे सांगण्यास सुरुवात केली.

'वीकली'च्या लेखाचे लेखक व पत्रकार एस. बाळकृष्णन यांनी असे म्हटले आहे, चव्हाण उपपंतप्रधान असताना 'चव्हाण हे कुचकामी उपपंतप्रधान आहेत, त्यांच्यात काही अर्थ नाही.' चव्हाण यांनी काँग्रेस (आय) मध्ये प्रवेश करण्याचे ठरविले आहे. त्यांच्याबरोवर काँग्रेस (आय) मध्ये जाण्याशिवाय माझ्यापुढे पर्याय नाही, असे पवार यांनी मला (बाळकृष्णन यांना) सांगितले. पण अगदी अखरेच्या क्षणी शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांना दगा दिला. या धक्क्यातून चव्हाण अखेरपर्यंत सावरले नाहीत (पवार प्ले : इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया डिसेंबर 1990). शरद पवार यांचे बोलणे आणि वागणे नेहमीच दुटप्पी राहिलेले आहे. पवार यांच्याविषयी जितकी अविश्वासार्हता आहे, तेवढी अविश्वासार्हता भारतातील इतर कोणत्याही नेत्याविषयी नाही. पवार यांच्या स्वभावानुसार पवार यांनी राजीव गांधींना असे सांगितले की, विश्वनाथ प्रताप सिंग यांचे सरकार पडू नये याकरिता काँग्रेसचा पाठिंबा मिळविण्याकरिता जनता दल नेते जॉर्ज फर्नांडिस माझ्याकडे आले होते. राजीव गांधी यांनी लोकसभेत पवार यांनी आपल्याला काय सांगितले याची माहिती दिली. लगेच फर्नांडिस यांनी शरद पवार यांच्या कारस्थानाचा गौप्यस्फोटच केला. यासंबंधात इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियाने 'पवार यांच्या सांगण्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही आणि फर्नांडिस यांनी जे सांगितले आहे तेच खरे आहे', असे स्पष्टपणे म्हटले आहे. पवार यांच्या दगाबाजीच्या राजकारणाची नोंद लोकसभा कामकाजाच्या इतिवृत्तात झाली आहे. एक तृतीयांश खासदारांचा गट घेऊन बाहेर काढून त्याचा पाठिंबा सिंग सरकारला देण्याकरिता पवार बोलणी करीत होते ही फर्नांडिस यांनी सांगितलेली हकीकत पवार यांच्या आजवरच्या राजकारणाशी त्यांच्या कारस्थानाशी सुसंगत होती. 28 नोव्हेंबर 1990 रोजी फर्नांडिस यांनी यू.एन.आय. या वृत्तसंस्थेला मुलाखत देऊन लोकसभेबाहेरही पवार यांच्या विरोधात ही माहिती सांगितली.

पवार यांची कशावरच निष्ठा नाही. ज्या यशवंतराव चव्हाण यांनी पवार यांना राजकीयद़ृष्ट्या वाढविले, त्या चव्हाणांविषयी बोलताना मी चव्हाणांमुळे राजकारणात मोठा झालो नाही, असे म्हणावयास पवार यांची जीभ धजावतेच कशी? चव्हाण यांचे ऋण मानण्याची ज्यांच्याजवळ दानत नाही, ते कोणाशी तरी एकनिष्ठ राहतील का? निष्ठाच नसल्यामुळे पवार पक्ष फोडण्याचा विचार करू शकतात.

– कै. जगन फडणीस, ज्येष्ठ पत्रकार  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news