चेहऱ्यावर थकवा, हाताला बँडेज तरीही शरद पवार पक्षाच्या शिबिरात, पहिल्यांदाच सभेत फक्त पाच मिनिटे बोलले

चेहऱ्यावर थकवा, हाताला बँडेज तरीही शरद पवार पक्षाच्या शिबिरात, पहिल्यांदाच सभेत फक्त पाच मिनिटे बोलले

पुढारी ऑनलाईन: ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू असताना देखील खासदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिर्डीमध्ये सुरु असलेल्या पक्षाच्या शिबिरात हजेरी लावली. या दरम्यान शरद पवार यांच्या हाताला बँडेज असल्याचे दिसून आले. आजारपणामुळे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे थकवा दिसून येत होता. शरद पवार यांनी केवळ पाच मिनिटे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी त्यांचे भाषण वाचून दाखवले.

४ नोव्हेंबरपासून शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा सुरू आहे. या शिबिरात पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. खासदार शरद पवार म्हणाले की, डॉक्टरांनी मला 10 ते 15 दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. हे पंधरा दिवस संपल्यानंतर नियमित कामकाजाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लहान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षाच्या विकासात सहभाग आहे ही अत्यंत समाधानाची बाब असल्याचे ते म्हणाले. पवार यांनी पुढे म्हटले की, शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही सर्वांची भाषणे ऐकून घेतली आहेत. सध्याची घडीला राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे. ही संधी आपल्याला लवकरच मिळेल अशी आशा असल्याचेही त्यांनी म्हटले.

जाहीर मेळाव्यात, सभेत आणि कार्यक्रमात सुमारे तासभर उभे राहून भाषण करणारे शरद पवार यांना आज मात्र आजारपणामुळे बसून भाषण करावे लागले. त्यांनी केवळ पाच मिनिटे भाषण करताना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भाषण करताना त्यांचा आवाज क्षीण असल्याचे दिसून आले. नंतर शरद पवार यांचे लिखित भाषण जेष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी वाचून दाखवले.

दरम्यान आज दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास खासदार शरद पवार हे डॉक्टरांच्या पथकासह विशेष हेलिकॉप्टरने शिर्डी येथे पक्षाच्या शिबिरासाठी दाखल झाले. कार्यकर्त्यांनीही त्यांचे उत्साहात स्वागत केले.

logo
Pudhari News
pudhari.news