‘ही’ नदी प्रदान करते पवित्र शाळीग्राम

पवित्र शाळीग्राम
पवित्र शाळीग्राम

काठमांडू : काही देव-देवतांची प्रतीकात्मक पूजा केली जात असते व अशा पूजेलाच अधिक महत्त्व असते. काही ठिकाणी ब्रह्मदेवांचे प्रतीक म्हणून शंखाची पूजा होते. शिवशंकरांची पूजा मूर्तीऐवजी शिवलिंगाच्या स्वरूपातच होते, त्याचप्रमाणे भगवान विष्णूची पूजा शाळीग्राम शिळेच्या रूपाने होत असते. श्री दत्तगुरुंच्या पूजेतही त्यांच्या पादुकांना, चरणचिन्हांनाच अधिक महत्त्व दिले जात असते. नर्मदा नदीमधील धावडी कुंडातील बाणलिंगांना देशविदेशात मागणी असते व हेच शिवलिंग अनेक ठिकाणी स्थापित होत असतात. त्याचप्रमाणे शाळीग्राम म्हटलं की नेपाळमधील काली गंडकी नदीचे महत्त्व समोर येते. याच नदीतील शाळीग्रामांची सर्वत्र विष्णूरूपात पूजा होत असते.

शाळीग्राम हा एक प्रकारचा जीवाश्म दगड आहे. नेपाळमध्ये दामोदर कुंडातून उगम पावणार्‍या काली गंडकी नदीमध्ये हे दगड आढळतात. त्यामुळे शाळीग्रामला 'गंडकी नंदन' असेही म्हटले जाते. वैज्ञानिकद़ृष्ट्या पाहिले तर हे एमोनाईट जीवाश्म आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण शिळांना धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. शाळीग्रामला बोलीभाषेत 'सालग्राम' असेही म्हटले जाते. नेपाळमध्ये गंडकी नदीच्या काठी 'सालग्राम' नावाचे एक गावही आहे. नेपाळच्या मुक्तिनाथ क्षेत्र येथे शालीग्राम मंदिरही आहे. नर्मदेतील बाणलिंगांप्रमाणेच गंडकीतील हे शाळीग्रामही सहज मिळत नाहीत.

काळ्या, करड्या रंगाचे हे चमकदार दगड असतात ज्यावर सफेद, निळ्या किंवा सोनेरी रेषाही आढळतात. अतिशय चमकदार व सोनेरी आभा असलेला शाळीग्राम तर अतिशय दुर्मीळ असतो. पूर्ण शाळीग्राममध्ये भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राची आकृती नैसर्गिकरीत्याच आढळते. शाळीग्राम 33 प्रकारांचे असतात. त्यापैकी 24 प्रकार विष्णूच्या 24 अवतारांशी संबंधित आहेत. हे 24 शाळीग्राम वर्षातील 24 एकादशींशीही संबंधित आहेत.

गोलाकार शाळीग्राम गोपाल रूपात, माशाचा आकाराचा शाळीग्राम मत्स्य अवताराच्या, कासवाच्या आकाराचा कुर्मावतार रूपात, सिंहाच्या जबड्यासारखा दिसणारा नृसिंह रूपात स्थापित केला जात असतो. शाळीग्राम मूर्ती ही स्वयंभू म्हणजेच स्वयंप्रकट मूर्ती मानली जाते. स्वयंनिर्मित मूर्तीला प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नाही. कोणतीही व्यक्ती त्यांना घरात किंवा मंदिरात स्थापित करून त्यांची पूजा करू शकते, असे मानले जाते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news