शैलजा दराडे यांचा जामीन फेटाळला

shailaja darade
shailaja darade

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने 44 जणांची तब्बल 5 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे (रा. पाषाण) यांचा जामीन अर्ज लष्कर न्यायालयाने फेटाळून लावला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी हा आदेश दिला. याबाबत पोपट सुखदेव सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली होती. सध्या दराडे या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी जामीन मिळावा यासाठी अर्ज केला. त्यास सरकारी वकिलांनी विरोध केला.

आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. सध्यस्थितीत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यांना जामीन मंजूर झाल्यास तपास कार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा जामीन मंजूर करण्यात येऊ नये, अशी विनंती सरकारी वकिलांनी युक्तिवादात केली. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून जामीन अर्ज फेटाळून लावला.

या प्रकरणातील फिर्यादी सूर्यवंशी हे शिक्षक असून, त्यांच्या नात्यातील महिलेला शिक्षक म्हणून नोकरी हवी होती. त्याची माहिती घेत असताना जून 2019 मध्ये सूर्यवंशी यांची भेट दादासाहेब दराडे याच्याशी झाली. त्याने आपली बहीण शैलजा दराडे शिक्षण विभागात अधिकारी असल्याचे सांगून मी तुमच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक पदावर नोकरीस लावतो असे सांगितले. याबदल्यात त्यांच्याकडून हडपसरमध्ये 27 लाख रुपये घेतले. काही महिने उलटल्यानंतरही नातेवाईक महिलांना नोकरी न लावल्याने सूर्यवंशी यांनी पैसे मागितले. मात्र, त्याने पैसे देण्यास नकार केला. त्यानंतर, दराडे यांनी विविध शासकीय विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 44 जणांची पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news