कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी आपण उभा राहणार नसल्याचे शाहू महाराज मला शेवटपर्यंत सांगत होते. परंतु, काही संधिसाधूनी मुद्दामहून त्यांना लोकसभा निवडणुकीत उभा केले आहे. शाहू महाराज यांचा सन्मान राखायचा होता, तर त्यांना राज्यसभेवर बिनविरोध का घेतले नाही, असा सवाल करत खा. संजय मंडलिक यांनी कोल्हापूरच्या गादीचा मान-सन्मान जरूर ठेवूया. परंतु, कोल्हापूरकर म्हणून आमचाही आत्मसन्मान राखला पाहिजे, असे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) पदाधिकार्यांचा शुक्रवारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात खा. मंडलिक बोलत होते. मेळाव्यास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांना पुन्हा खासदार करावे, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
शाहू महाराज मला आदरणीयच आहेत. त्यांच्याशी आपले वैयक्तिक संबंध फार चांगले आहेत. असे सांगून मंडलिक म्हणाले, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तुझ्यासोबत पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत, त्यांच्यासोबत राहा, तुझा विजय निश्चित असल्याचे सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, राष्ट्रवादीच्या युवती शहराध्यक्षा पूजा साळोखे, फिरोज सौदागर, रामेश्वर पत्की, आदील फरास आदींची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्ष श्रीमती रेखा आवळे, माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, राष्ट्रवादीचे शहर युवक अध्यक्ष महेंद्र चव्हाण, रमेश पोवार, प्रकाश गवंडी आदी उपस्थित होते.
जिल्हा बँकेचे संचालक जाणार परदेश दौर्यावर
मतदान झाल्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक सहलीसाठी स्वखर्चाने परदेश दौर्यावर जाणार आहोत. यावेळी एका महिलेने आमचे अयोध्येला श्रीरामाच्या दर्शनासाठी जायचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मुश्रीफ यांनी तुम्ही रेल्वे बुक करा, अयोध्यालाही जाऊया.
माजी नगरसेवक गेले निघून
भाजपशी विशेषत: महाडिक यांच्याशी आपले जमणार नाही, असे पालकमंत्री मुश्रीफ यांना सांगून एक माजी नगरसेवक निघून गेला, याची चर्चा मेळाव्याच्या ठिकाणी होती.