पाकिस्तानमध्ये मुलांचे लैंगिक शोषण
इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानी लष्करातील सर्वांत मोठ्या सेक्स स्कँडलचा उलगडा झाला आहे. खैबर पख्तूनख्वाच्या कबाईली परिसरात तैनात असलेल्या कर्नल ते मेजर पदावरील काही अधिकार्यांनी लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याचे 600 हून अधिक व्हिडीओ समोर आल्याने पाकिस्तानात खळबळ माजली आहे. मुलांचे वय 14 वर्षांहून कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. जवळपास शंभरपेक्षा अधिक पाच वर्षांच्या मुलांचे लैंगिक शौषण करण्यात आले होता.
आता काही लष्करी अधिकार्यांना पाराचिनार केंटहून पेशावरमधील कमांडच्या मुख्यालयात बोलवण्यात आले आहे. कोणत्याही लष्करी अधिकार्याने मुलांचे लैंगिक शोषण केल्याचे निष्पन्न झाल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा कमांडर लेफ्टनंट जनरल हसन अझहर हयात यांनी दिला आहे. पण अधिकार्यांनी मुलांचे लैंगिक शोषण केले नसल्याचे सांगितले आहे.
तीन वर्षापूर्वी 13 वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप काही अधिकार्यांवर केला होता. पण ते खोटे असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एका स्थानिक दुकानदाराला अटक करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. कबाईली भागातील ताहिर कबादी या दुकानदाराचे लष्कराशी चांगले संबंध होते. लहान मुलांना लालूच दाखवून तो त्यांना लष्करी अधिकार्यांकडे पाठवत असायचा. दुकानदारानेही मुलांचे लैंगिक शोषण केल्याचे व्हिडीओ समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.
ब्लॅकमेल करून खंडणी वसूल
लैंगिक शोषणाचे व्हिडीओची भीती दाखवून तो दुकानदार लहान मुलांना ब्लॅकमेल करून त्यांच्या आई-वडिलांकडून खंडणी वसूल करायचा. पोलिसांनी त्याचा लॅपटॉप जप्त केला आहे. यापूर्वीही मुलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप लष्करी अधिकार्यांवर करण्यात आले होते. पण ती प्रकरणेही दाबण्यात आली होती. 2015 मध्ये मुलांचे लैंगिक शोषण केल्याचे सुमारे 400 व्हिडीओ समोर आले होते. हे व्हिडीओ 50 रुपयांना विकले गेले होते.