२८ धरणे कोरडी; ७,०७२ गावे-वाड्या टँकरग्रस्त!

file photo
file photo

कोल्हापूर : राज्यात गेल्यावर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानाचे चटके आता बसू लागले असून, राज्याच्या अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. राज्यातील मोठ्या धरणांपैकी 28 धरणे कोरडी पडली आहेत, तर 7,072 गावे-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पुणे विभागात सर्वाधिक पाणीटंचाई निर्माण झाल्याचे दिसत आहे. आगामी दोन महिन्यांत राज्याच्या घशाला भीषण कोरड पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

राज्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1,400 मिलिमीटर आहे; पण राज्यातील एकाही जिल्ह्यात गेल्यावर्षी समाधानकारक किंवा सरासरीइतका पाऊस झालेला नाही. केवळ तीन जिल्ह्यांमध्ये 80 टक्क्यांवर पाऊस झालेला आहे. 23 जिल्ह्यांमध्ये 60 ते 80 टक्क्यांच्या आसपास पाऊस झालेला आहे. दुष्काळ प्रवण 9 जिल्ह्यांमध्ये तर 60 ते 70 टक्क्यांच्या आसपासच पाऊस झाला
आहे. परिणामी, गेल्यावर्षी राज्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा होऊ शकलेला नाही. कोयना, उजनी आणि जायकवाडीसारखी मोठी धरणे पूर्ण क्षमतेने भरू शकलेली नाहीत.

धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा!

राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान अशा एकूण 2,994 धरणांची पाणी साठवण क्षमता 1,703 टीएमसी इतकी आहे; पण आजघडीला या सर्व धरणांमध्ये मिळून केवळ 442 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. 138 मोठ्या धरणांची क्षमता 1,255 टीएमसी
असून, आजघडीला या धरणांमध्ये केवळ 305 टीएमसी म्हणजे 24 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मोठ्या धरणांपैकी 28 धरणे कोरडीठाक पडली असून, या धरणांच्या लाभक्षेत्रात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झालेली दिसत आहे. राज्यात 260 मध्यम प्रकल्प असून,
त्यांची पाणी साठवण क्षमता 218 टीएमसी इतकी आहे; पण आज या मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त 74 टीएमसी म्हणजे 34 टक्के पाणीसाठा आहे. राज्यातील 2,596 लहान धरणांची पाणी साठवण क्षमता 230 टीएमसी आहे; पण आज या धरणांमध्ये केवळ 63 टीएमसी म्हणजे 27 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मराठवाड्यात तीव्र टंचाई!

पाणी उपलब्धतेच्या बाबतीत सर्वात चिंताजनक अवस्था मराठवाड्याची आहे. मराठवाड्यातील धरणांमध्ये केवळ 11 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे आणि नाशिक विभागात अनुक्रमे 27 आणि 28 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कोकण, नागपूर आणि अमरावती विभागात मात्र 34 ते 42 टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा शिल्लक आहे.

हजारो गावे तहानलेली!

कमी पर्जन्यमान, धरणांमधील अपुरा पाणीसाठा आणि कडक उन्हाळ्यामुळे राज्यातील हजारो गावे आजकाल पिण्याच्या पाण्याला महाग झाली आहेत. परिणामी, राज्यातील 2,047 गावे आणि 5,025 वाड्यावस्त्यांना आज टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक टँकरग्रस्त गावे पुणे विभागात आहेत, त्याखालोखाल नाशिक आणि औरंगाबाद विभागातील गावे टँकरग्रस्त झाली आहेत. नागपूर आणि अमरावती विभागात मात्र टँकरग्रस्त गावांची संख्या कमी आहे. मात्र, दररोज जवळपास शंभरभर गावे टँकरग्रस्त होताना दिसत आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीपर्यंत राज्यातील टँकरग्रस्त गावांची संख्या 10 हजारांचा टप्पा ओलांडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

कोरडी पडलेली धरणे

कालिसरार, खडकपूर्णा, बोरगाव अंजनपूर, माजलगाव, मांजरा, रोशनपुरी, सिरसमार्ग, वांगदरी, ढालेगाव, गुंजारगा, किल्लारी, निम्न तेरणा, मदनसुरी, राजेगाव, सिना कोळेगाव, तागरखेडा, बिंडगीहाळ, कारसा पोहरेगाव, टाकळगाव देवळा, वांजरखेडा, निम्न दुधना, चणकापूर.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news