मुंबई क्रिकेटचा दबदबा गेल्या काही दशकांत कमी झाला. क्रिकेट हे आता फक्त काही महानगरांपुरते मर्यादित न राहता थेट झारखंड, उत्तर प्रदेशच्या गावागावांत पोहोचले. नवनवे तारे देशाच्या क्रिकेटपटलावर चमकायला लागले. प्रत्येकाच्या जिद्दीची कहाणी वेगळी; पण उद्देश भारतासाठी खेळणे हाच आहे.
भारताने रांची कसोटी आणि इंग्लड विरुद्ध मालिका जिंकली आणि भारतीय क्रिकेटचा नवा अध्याय सुरू झाला. हा अध्याय आहे तो भारतीय युवा शक्तीचा. भारतासारख्या अवाढव्य देशात गुणवत्तेला कमतरता अजिबात नाही. किंबहुना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ म्हणून एका वेळी उतरवता येतील असे तीन ते चार संघ बांधता येतील इतके गुणवान खेळाडू आपल्याकडे आज तयार आहेत. इतकी गुणवत्ता असताना यश हे कुणीही गृहीत धरेल; पण कसोटी क्रिकेट आणि मर्यादित षटकांचे क्रिकेट हे सर्वस्वी वेगळे असते. कसोटी क्रिकेटला गुणवत्तेबरोबर तितकीच गरज असते ती टेंपरामेंट म्हणजे वेळ पाहून आपला खेळ करायची. मर्यादित षटकातही टेंपरामेंट लागतेच; पण काही चेंडू अथवा काही षटके खेळणे आणि काही तासांची सत्रे खेळणे सर्वस्वी भिन्न आहे. यामुळेच या युवा शक्तीच्या विजयाला जास्त महत्त्व आहे. भारतीय क्रिकेटचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, हे या मालिका विजयाने दाखवून दिले.
2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौर्यात कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियात मालिका जिंकायचा पराक्रम केला होता तेव्हा वॉशिंग्टन सुंदर, नटराजन, सैनीसारखे कसोटी क्रिकेटमध्ये श्रीगणेशा करणारे खेळाडू खेळवून मालिका जिंकायचा पराक्रम आपण केला होता. त्यांनतर असाच पराक्रम रोहित शर्माने सर्फराज खान, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल या युवा खेळाडूंच्या कामगिरीवर केला आहे. यात एक साम्य आहे ते म्हणजे, या दोन्ही मालिका विजयात रहाणे आणि शर्मा हे मुंबईचे कर्णधार होते. याला मी योगायोग अजिबात म्हणणार नाही. कारण, मुंबई क्रिकेटचे संस्कार हे भारतातील सर्व ठिकाणच्या क्रिकेटपेक्षा वेगळे आहेत. मुंबईचा क्रिकेटपटू खडूस म्हणून ओळखला जातो. खडूस म्हणजे तुसडा नाही, तर खडूस म्हणजे जो सहजासहजी हार मानत नाही असा. या दोन्ही कर्णधारणांनी उपलब्ध संघाला घेऊन समोरच्या बलाढ्य संघाला टक्कर देत मालिका जिंकल्या, याचे श्रेय त्यांच्या नेतृत्वात जितके आहे तितकेच त्यांना क्रिकेटचे बाळकडू देणार्या मुंबई क्रिकेटच्या संस्कारात आहे.
यशस्वी जैस्वालने राजकोट कसोटीनंतर आपल्या मुलाखतीत सांगितले की, मुंबईत क्रिकेट खेळण्याची लढाई ही क्रिकेटच्या मैदान गाठण्यापासून सुरू होते. सकाळच्या वेळी चर्चगेट फास्ट लोकलमध्ये आपली प्रचंड मोठी किट बॅग घेऊन लोकांच्या गर्दीत टोमणे खात उभे राहून आझाद किंवा क्रॉस मैदान गाठले की, मैदानावरच्या प्रतिस्पर्ध्याचे स्लेजिंग झेलायची तयारी अगोदरच झालेली असते. मुंबई क्रिकेटचा दबदबा गेल्या काही दशकांत कमी झाला. कारण, देशातल्या अगदी ब किंवा क दर्जाच्या शहरातल्या खेळाडूंना संधीचे व्यासपीठ मिळाले. त्यांच्यातली गुणवत्ता शोधून काढायच्या विविध योजना कार्यान्वित झाल्या.
क्रिकेट हे आता फक्त मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबादपुरते मर्यादित न राहता ते थेट झारखंड, उत्तर प्रदेशच्या गावागावांत पोहोचले. नवनवे तारे देशाच्या क्रिकेटपटलावर चमकायला लागले. असं लक्षात आलं की, प्रत्येकाच्या जिद्दीची कहाणी वेगळीच होती; पण सगळ्यांचा उद्देश एकच होता ते म्हणजे भारतासाठी खेळणे. थोडक्यात सांगायचे, तर मुंबईच्या क्रिकेटपटूंच्या लोकलच्या गर्दीतून मैदान गाठायची कहाणी आता देशाला लागू पडत होती. या 140 कोटींच्या लोकलच्या गर्दीतून वाट काढत अंतिम अकरा जणांच्या संघात जागा पटकवायला विशेष कौशल्य आणि त्याचबरोबर प्रचंड मेहनतीची गरज होती. ही तपश्चर्या ज्यांनी दाखवली त्यांना फळे मिळालीच.
इंग्लडविरुद्धच्या मालिकेसाठी जेव्हा भारताचा संघ जाहीर झाला तेव्हा कोहली वैयक्तिक कारणामुळे, तर शमी दुखापतीमुळे बाहेर असल्याने पहिल्या दोन सामन्यांत मधली फळी सांभाळायची जबाबदारी के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यरवर होती, तर ऋषभ पंत अजूनही क्रिकेटपासून दूर असल्याने यष्टिरक्षक भरत हे नक्की होते. जाहीर केलेल्या संघात सर्फराज खान, ध्रुव जुरेल, पाटीदार, सौरभ कुमार, वॉशिंग्टन सुंदर वगैरे नावे होती; पण त्यांना संधी कितपत मिळेल ही शंकाच होती. पहिल्या कसोटीत राहुल जायबंदी झाला आणि पाटीदार संघात आला.
दुसर्या कसोटीत जडेजा जायबंदी झाला, तरी सर्फराजची प्रतीक्षा अजून संपली नव्हती. श्रेयस अय्यरला अखेर डच्चू मिळाला. राहुल मालिकेतून बाहेर गेला आणि यष्टीरक्षक भरत फलंदाजीला हातभार लावण्यात कमी पडतोय, हे लक्षात आल्यावर सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला आयुष्याची इतिकर्त्यव्यता पूर्ण करणारी भारतीय कसोटी संघाची कॅप मिळाली. इंग्लडने बॅझबॉल क्रिकेटचे धोरण अवलंबल्यावर आणि कर्णधार म्हणून बेन स्टोक्सने सूत्रे हाती घेतल्यावर त्यांच्या यशाचा आलेख चढता आहे. एक कर्णधार म्हणून त्याला दोन इच्छा पूर्ण करायच्या आहेत. त्या म्हणजे, भारत आणि ऑस्ट्रेलियालाच त्यांच्याच देशात पराभव. या मालिकेत भारतीय संघात जी स्थित्यंतरे झाली आणि नव्या खेळाडूंची संघात वर्णी लावली ते बघता बेन स्टोक्स ही मालिका जिंकायची स्वप्ने पाहत नसला तरच नवल होते; पण भारताच्या युवा शक्तीने बेन स्टोक्सचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही.
भारताच्या राजकोट आणि रांचीच्या विजयात ज्या नव्या खेळाडूंनी म्हणजेच सर्फराज खान, ध्रुव जुरेल आणि आकाशदीप यांनी हातभार लावला त्यांच्या इथपर्यंत पोहोचायच्या कहाण्या वेगवेगळ्या आहेत. सर्फराज खान हे नाव मुंबई क्रिकेटच्या पटलावर बरीच वर्षे ऐकू येत आहे. हॅरिस शिल्ड स्पर्धेत त्याने फक्त 421 चेंडूत 439 धावा करून सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला तेव्हाच सर्फराजच्या नावाचा बोलबाला झाला होता. आज सर्फराज 26 वर्षांचा आहे. म्हणजेच वयाच्या बाराव्या वर्षी शालेय क्रिकेट गाजवूनही कसोटीपर्यंत पोहोचायला त्याला चौदा वर्षांची खडतर तपश्चर्या करावी लागली. यात त्याचे वडील आणि प्रशिक्षक नौशाद खान यांचा मोठा वाटा आहे. नौशाद खान स्वतः क्रिकेटपटू होते. रणजी संघाच्या संभाव्य खेळाडूंत असून त्यांना रणजी करंडकात खेळायची संधी मिळाली नव्हती. आपले अधुरे स्पप्न त्यांनी आपल्या मुलाकडून पूर्ण केले. रोज सकाळी साडेचार वाजता उठून नौशाद खान यांची पत्नी सर्वांचा जेवणाचा डबा बनवते. सकाळी पाच वाजता सर्फराज आणि नौशाद मैदानावर जायला निघायचे.
दिवसभर मैदानावर घाम गाळल्यावर त्यांनी घराच्या बाजूला पावसाळ्यात खेळता येईल अशी सिंथेटिक टर्फ बनवली होती, तिथे सराव व्हायचा. क्रिकेटच्या ध्यासापोटी सर्फराज शाळेत न जाऊन घरीच शिकवणी लावून काही वर्षे शिकला. 2014 मध्ये त्याला मुंबईच्या संघातून रणजी पदार्पण करता आले. वडिलांचे एक स्वप्न पूर्ण झाले होते. 2014 च्या अंडर 19 विश्वचषकाच्या संघात त्याचा समावेश झाला. पुन्हा 2016 च्या अंडर 19 विश्वचषकात तो खेळला; पण अजून पुढचा प्रवास धूसरच दिसत होता. हा सर्व प्रवास सुखकर नव्हता. मुंबईकडून रणजी खेळायला पुरेशी संधी मिळत नाही म्हणून तो उत्तर प्रदेशकडून खेळायला लागला. तिथून पुन्हा मुंबईला आल्यावर रणजी स्पर्धेत त्याने त्रिशतक ठोकले. धावांचा रतीब घालत होता; पण त्याचे मैदानावरचे वर्तन खटकणारे होते.
दिल्ली विरुद्धच्या रणजी सामन्यात शतक ठोकत मुंबईला संकटातून बाहेर काढल्यावर ड्रेसिंग रूमकडे त्याने केलेले इशारे गैरवर्तनात मोडणारे होते. 2019-20 मध्ये 928, 2022-23 मध्ये 982 आणि 2022-23 यामध्ये 656 अशा तीन रणजी मोसमात त्याने तब्बल 2,566 धावा काढल्या, तरी त्याची निवड गेल्या वर्षी वेस्ट इंडिजच्या दौर्यासाठी झाली नाही. कुणाच्या मते, सर्फराज खानच्या वडिलांच्या कठोर उपायांचा परिणाम त्याच्या मैदानावरच्या बंडखोरीत दिसतो; पण बाप-लेकाचे नाते अतूट आहे. मुंबईकडून पात्रता असताना अमोल मुझुमदार, पद्माकर शिवलकर यांना शेवटपर्यंत कसोटीची संधी मिळाली नाही. काहीसे असेच सर्फराजबाबत होते की काय वाटत असताना त्याला या मालिकेत संधी मिळाली आणि पदार्पणाच्या सामन्यातच त्याने त्या संधीचे सोने केले. त्याचा जर्सी क्रमांक 97 आहे, ज्याचा उच्चार नौ-सात असा त्याच्या वडिलांच्या नावाच्या जवळ जातो.
भारताचा यष्टिरक्षक ध्रुव जुरेलने राजकोट कसोटीत पदार्पणात आपली चमक दाखवली; पण रांची कसोटीत तो समस्त भारतीयांचा लाडका झाला. त्याच्या वडिलांनी कारगिल युद्धात भारताला विजय मिळवून दिला, तर मुलाने रांचीला क्रिकेटच्या मैदानात. मुलाने आपल्यासारखेच आर्मीत जावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती; पण ध्रुवला बॉम्ब गोळ्यांपेक्षा क्रिकेटचा लाल चेंडू जास्त जवळ होता. घरी आजोबांचे श्राद्ध असल्याने वडिलांना वेळ नव्हता; पण क्रिकेट अकादमी गाठणे गरजेचे होते म्हणून 14 वर्षार्ंचा कोवळा ध्रुव आग्य्राहून दिल्ली मार्गे नोएडाला एकटाच पोहोचला. अर्थात, ही सुरुवात होती. कार्तिक त्यांगींनी त्याला राजस्थान रॉयल्सच्या निवड चाचणीसाठी पाठवले. त्यावर्षी तो उत्तर प्रदेशकडून खेळातही नव्हता; पण निवड चाचणीत त्याचे काही घणाघाती फटके त्याच्यातील चुणूक दाखवून गेले.
झुबीन भरुचाने ध्रुवमधील गुणवत्ता जोखली आणि राजस्थान रॉयल्सकडे त्याच्या निवडीची शिफारस केली. राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात दाखल झाल्यावर ध्रुव जुरेलने जी मेहनत केली त्याचेच फळ आज आपण बघत आहोत. टी-20 क्रिकेट असो, एक दिवसीय व कसोटी असो, झुबीन भरुचाने ध्रुवच्या बाबतीत तो कुठच्याही परिस्थितीत धावा कशा कसेल हे धोरण राबवले. कसोटी संघात खेळायच्या आधी त्याने राजस्थानच्या सराव शिबिरात तब्बल चार-चारवेळा वेगवेगळी फिरकी खेळायचा सराव केला. रांची कसोटीत ध्रुवच्या कुलदीपबरोबर केलेल्या पहिल्या डावातील भागीदारीत त्याच्या धावा काढण्यातील सहजता आपण बघितली. संयम आणि फटकेबाजी यांचे सुरेख मिश्रण करत त्याने धावफलक हलता ठेवला. दुसर्या डावात जेव्हा गिलच्या जोडीला ध्रुव आला तेव्हा एकेरी-दुहेरी जास्त सहजतेने निघायला लागल्या. आकाशदीपने वडिलांचे आणि मोठ्या भावाचे छत्र हरवल्यावरही प्रचंड कष्ट करत हा टप्पा गाठला. भारतीय संघ आज नव्या ऊर्जेने परिपूर्ण आहे.
रोहित शर्माने सांगितलेच आहे, ज्यांना यशाची भूक आहे त्यांचाच विचार यापुढे भारतीय संघासाठी केला जाईल. स्थानिक क्रिकेट खेळण्याचा आदेश झुगारून आयपीएलवर लक्ष केंद्रित करणार्या ईशान किशनसारख्यांना भारतीय संघाचे दरवाजे कायमचे बंद झाल्यासारखे आहेत. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना वार्षिक करारातून वगळून बोर्डाने एक उत्तम संदेश दिला आहे. आज रोहित शर्मा, कोहली, जडेजा, बुमराह, शमी असे मोजकेच वगळता कुणीच आपले संघातील स्थान पक्के समजू शकत नाही इतकी गुणवत्ता आणि स्पर्धा आहे. या नव्या युवा शक्तीने भारताला कसोटी मालिकेत विजय मिळवण्यात हातभार लावला आणि रातोरात ते स्टार झाले. आता या युवा शक्तीची खरी परीक्षा आहे ती पैसा, प्रसिद्धी यांच्या वलयातून कामगिरीत सातत्य कसे राखायचे याची. आज तरी या नव्या खेळाडूंनी नवी आशा जागवली आहे.