कोल्हापूर : पर्यावरण संवर्धनाचा भाग म्हणून वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने ई-व्हेईकल वापरण्यास प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे अशा वाहनांंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डिझेल, पेट्रोल, सीएनजी, गॅस या इंधनाच्या दरात होणारी वाढ पाहता नागरिकांचा ई-व्हेईकलकडे कल वाढत आहे. परिणामी, या कामात महावितरण कंपनीने एक पाऊल पुढे टाकून ई-व्हेईकल वापरणार्यांना स्वतंत्र मीटर व दरपत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब ई-व्हेईकलचा वापर करणार्यांसाठी दिलासादायक असून, यामुळे आणखी पैशांची बचत होणार आहे.
सद्यस्थितीत घरगुती कनेक्शनवरच वाहनांचे चार्जिंग मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे घरगुती वीज वापराच्या विविध स्लॅबच्या दराप्रमाणे वीज आकारणी होत असल्याने वीज बिल वाढते; पण स्वतंत्र कनेक्शन, मीटर आणि दरपत्रकामुळे आता आर्थिक भार कमी होणार आहे.
भविष्यातील इंधनाचे संकट टाळण्यासाठी आणि पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी केंद्र सरकारने ई-व्हेईकलला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. पहिल्या टप्प्यात या व्हेईकल खरेदीसाठी प्रोत्साहनपर अनुदान दिले होते. त्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात अशा वाहनांचा वापर सुरू झाला आहे. चार्जिंग लावताना ते घरगुती वीज कनेक्शवरूनच जोडले जात आहे. त्यामुळे विजेचे बिल वाढू लागल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे महावितरण कंपनीनेही अशी वाहने वापरणार्यांना स्वतंत्र कनेक्शन, मीटर आणि दरपत्रकाची नवी योजना आखली आहे. या नव्या योजनेचा फायदा थेट ग्राहकांना होणार आहे.
महावितरणने अशा ग्राहकांना दुसरे पर्यायी कनेक्शन देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी महावितरणचा जोडणी फॉर्म भरावा लागेल. त्यासोबत तारतंत्रीचा विद्युत अहवाल जोडणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वीज मागणीच्या क्षमतेनुसार अनामत रक्कम भरून घेतली जाते. त्यानंतर त्या ग्राहकास स्वंतत्र वीज मीटर देण्यात येतो. सध्या घरगुती ग्राहकांना 1 ते 100 युनिट वीज वापरासाठी 4 रुपये 41 पैसे आकारले जातात. त्यापुढील युनिटसाठी जास्त दराने आकारणी होते. मात्र, या ग्राहकांसाठी एकच दर आकारला जाणार आहे. त्यामुळे स्लॅबनुसार दरवाढीचा फटका या ग्राहकांना बसणार नाही.
एक कार फुल्ल चार्ज करण्यासाठी 7 ते 8 तास लागतात. त्यासाठी 30 युनिट वीज वापर होतो. फुल्ल चार्ज झालेली कार सुमारे 400 किलोमीटर अंतर कापते, असा कंपन्यांचा दावा आहे. रॅपिड चार्जरने चार्जिंगसाठी 30 ते 40 मिनिटे लागतात; तर दुचाकी चार्जिंगसाठी 4 युनिट वीज लागते. त्यासाठी स्लो चार्जरने 5 तास, तर रॅपिड चार्जरने दोन तास लागतात. 4 युनिटमध्ये दुचाकी सुमारे 150 ते 200 कि.मी. अंतर कापते.