पुणे : संरक्षण संशोधन व विकास संस्थेचा (डीआरडीओ) माजी शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकरला वाचवण्यासाठी केंद्र सरकारने देशद्रोहाचा कायदा रद्द केला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. पुण्यातील काँग्रेस भवन येथे शनिवारी (दि. 12) पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले, 'डॉ. कुरुलकरने देशातील संरक्षणविषयक माहिती पाकिस्तानला दिली आहे. हा देशद्रोह आहे. कुरुलकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) आहे. त्या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी मोदी सरकारने कायद्यातील देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे बिल लोकसभेत मांडले आहे.'
डॉ. कुरुलकरने देशद्रोह केला आहे. राष्ट्राच्या सुरक्षिततेशी निगडीत गुपिते पाकिस्तानला दिल्याप्रकरणी त्याला अटक झाली आहे. डॉ. कुरूलकरच्या अटकेनंतर केवळ त्याला वाचवण्यासाठी देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचा प्रस्ताव आणला, हे आता सर्वसामान्य जनतेला कळून चुकले आहे, असेही पटोले म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील बैठकीबाबत पटोले म्हणाले, की मित्रपक्षांच्या घडामोडींकडे लक्ष देण्याची आम्हाला गरज नाही. मात्र, शरद पवार हे इंडिया आघाडीसोबतच राहतील, असा आम्हाला विश्वास आहे.
पुण्यात पिकते ते देशात विकते, त्यानुसार केंद्रातील सरकार बदलाची सुरुवात पुण्यातून होईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. गटबाजीमुळे पुण्यातील काँग्रेसची जमीन भुसभुशीत झाली आहे, यावर काय करणार ? याबाबत विचारले असता, पटोले यांनी गटबाजी करणार्यांना कडक इशारा दिला. मी म्हणजे पक्ष अशी काही नेत्यांची भूमिका योग्य नाही. काही गोटे राहून जातात. आगामी काळात यामध्ये निश्चितच सुधारणा झाल्याचे पाहायला मिळेल, असेही ते म्हणाले.
इंडिया आघाडीची बैठक
आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस व मित्रपक्षांच्या 'इंडिया' आघाडीने तयारी केली असून, महागाई, बेरोजगारी, शेतकर्यांचे प्रश्न जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी येत्या काळात राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने पटोले यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी काँग्रेस भवन येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (यूटी) यांच्यासह समविचारी पक्ष व संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक झाली. दरम्यान, काँग्रेस पक्ष राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात तयारी करत असून, केंद्र व राज्य सरकारच्या कामाची पोलखोल करण्यासाठी राज्यात 3 ते 17 सप्टेंबरदरम्यान पदयात्रा काढणार आहे. गणेशोत्सवानंतर पदयात्रेचा व सभांचा दुसरा टप्पा सुरू होणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.
हेही वाचा