मुंबई मनपाच्या अखत्यारित येणाऱ्या पहिली ते ११ वी पर्यंतचे वर्ग ३१ जानेवारीपर्यंत बंद

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

मुंबई; पुढारी ऑनलाईन

महामुंबईत पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने शाळांवर पुन्हा एकदा गदा आली आहे. मुंबई मनपाच्या अखत्यारित येणाऱ्या पहिली ते आठवी तसेच नववी आणि अकरावीचे वर्ग ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, दुसरीकडे दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु राहतील. दरम्यान, प्रत्यक्ष शाळांचे वर्ग बंद करण्यात आले असले, तरी ऑफलाईन सुरु राहतील. उद्यापासून हा निर्णय लागू होईल.

दरम्यान, देशभरात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे संकेत मिळत असून, केंद्र सरकारने आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

दरम्यान, राज्यात रविवारी (दि. 2) 11 हजार 877 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 50 ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली. मुंबईत 8 हजार 063 इतक्या रुग्णांची नोंद झाली. मागील काही दिवसांपासून वेगाने रुग्णसंख्या वाढल्याने राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 42 हजारांवर पोहोचली आहे. राज्यात आजवर 67 लाख नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. त्यातील 65 लाख 12 हजार नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1 लाख 41 हजार 542 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. राज्याचा मृत्युदर 2.11 इतका आहे.

रविवारी देशात एका दिवसात 27 हजार 553 कोरोनाबाधितांची भर पडली असून, सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 22 हजारांवर गेली, तर 284 रुग्णांचा मृत्यू झाला. दिल्लीसह मुंबई आणि कोलकाता शहरात कोरोना वेगाने पसरत आहे. पश्‍चिम बंगाल सरकारने सोमवारपासून
कोलकाता शहरात मर्यादित निर्बंध लागू केले. देशात ओमायक्रॉनही पसरत असून, बाधितांची संख्या 1,525 झाली आहे.

महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या संसर्गाचा वेग पाहता या लाटेत 80 लाख नागरिक बाधित होण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. यामध्ये मृत्यूचे प्रमाण 1 टक्‍का जरी गृहीत धरले, तरी 80 हजार मृत्यू होऊ शकतात. यात विविध आजार असलेल्या नागरिकांना तसेच ज्येष्ठांना सर्वाधिक धोका असल्याने ही लाट गांभीर्याने घ्यावी, असा इशारा राज्याचे अतिरिक्‍त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त आणि जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना पाठवलेल्या पत्रात दिला आहे. ज्यांचे लसीकरण झालेले नाही अथवा ज्यांना गंभीर स्वरूपाचे इतर आजार आहेत, त्यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांसाठी हा विषाणू तेवढाच घातक आहे. त्यामुळे लसीकरणाला गती द्यावी आणि लोकांचे जीव वाचवावेत, असे या पत्रात म्हटलेले आहे.

ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 510 वर

राज्यात ओमायक्रॉनबाधितांची संख्या 510 वर पोहोचली आहे. रविवारी 50 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली. यातील तब्बल 36 रुग्ण पुणे शहरातील आहेत, तर पिंपरीचिंचवडमध्ये 8, पुणे ग्रामीणमध्ये 2, सांगली, ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 510 पैकी आजवर 193 ओमायक्रॉनबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत सर्वाधिक 328 ओमायक्रॉनबाधित रुग्ण आहेत. याखालोखाल पुणे मनपा क्षेत्रात 49, पिंपरी-चिंचवडमध्ये 36, तर पुणे ग्रामीण 23, ठाण्यात 13, नवी मुंबई, पनवेलमध्ये प्रत्येकी 8, कल्याण डोंबिवली 7, नागपूर आणि सातार्‍यात प्रत्येकी 6 रुग्ण आहेत.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news