School Entrance Festival : राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये रंगणार प्रवेशोत्सव

School Entrance Festival : राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये रंगणार प्रवेशोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर गुरुवार (दि.१५) पासून राज्यातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. अपवाद केवळ विदर्भाचा असून, तिथे २६ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षात शाळेचा प्रारंभ हा चैतन्यमय आणि उत्साहवर्धक होण्यासाठी शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गाेडी निर्माण करण्यासाठी शाळेचा पहिला दिवस 'प्रवेशोत्सव' म्हणून साजरा केला जाणार आहे.

आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात सध्या ५०२ शासकीय व ५४६ अनुदानित आश्रमशाळा सुरू असून, त्यामध्ये सुमारे साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर २६ एकलव्य निवासी शाळांमधून हजारो विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवितात. सन २०२३-२४ या नवीन शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षण विभागाप्रमाणेच आदिवासी विकास विभागाच्या शाळा गजबजणार आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या वाटचालीला गती देण्यासाठी 'प्रवेशोत्सव' रंगणार आहे. दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आश्रमशाळांना अचानक भेटी देणार आहेत. त्यासाठी आयुक्त, अपर आयुक्त तसेच प्रकल्प अधिकारी स्तरावर नियोजन केले आहे. भेटीदरम्यान अनुपस्थित शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत पूर्णवेळ हजर राहावे लागणार आहे.

शाळा परिसर स्वच्छतेच्या सूचना

आगामी शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होण्यापूर्वी शाळा परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर सोपविली आहे. शालेय व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, एनजीओ, सार्वजनिक मंडळे, बचतगट, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या सहकार्याने शाळा परिसराचे सुशोभीकरण करण्याच्या सूचना आयुक्तस्तरावरून दिल्या आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news