पुणे, पुढारी वृत्तसेवा : हडपसर येथील एंजल मिनी मिकी शाळेच्या बसला मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागली. त्यावेळी ही गाडी शाळेच्या आवारात उभी होती. मात्र, मोहरम सणामुळे विद्यार्थ्यांना सुट्टी असल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी घडली नाही.
एका प्रायव्हेट ठेकेदाराकडून ही बस शालेय वाहतुकीसाठी घेण्यात आली होती. अशा एकूण सहा गाड्यांमार्फत या शाळेवर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. मात्र या गाड्यांकडून मोटर वाहन कायद्यातील कोणत्याही नियमांचे पालन होत नसल्याचे प्रथम दर्शनी पाहणीत समोर आले आहे.
या गाडीचा रंग पिवळा नव्हता. गाडीवर शालेय वाहतुकीचे चित्र नव्हते. गाडीला शालेय वाहतुकीचा परवाना देखील नाही. त्यामुळे ही अनधिकृत रित्या सुरू असलेली शालेय वाहतूक होती. याबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना विचारले असता ते म्हणाले, सदरील गाडी आरटीओच्या रेकॉर्डनुसार शालेय वाहतुकीची नव्हती. ती कॉन्ट्रॅक्ट कॅरेज परमिटवरील होती. याच्या तपासणीसाठी आम्ही पथक पाठवले आहे.
शहरात अनेक वाहन चालक अनधिकृत रित्या सर्रासपणे शालेय वाहतूक करत आहेत. यात पीएमपीचाही समावेश आहे. मात्र आरटीओ अधिकारी याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अशा अनधिकृत शालेय वाहतुकींना प्रोत्साहन मिळत असून, आता विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्न उभा राहिला आहे.
घटनास्थळी आरटीओचे वायुवेग पथक पाठवण्यात आले आहे. गाडीची फिटनेस तपासणी झाली आहे की नाही, गाडीला शालेय वाहतुकीचा परवाना आहे की नाही, यासारख्या मोटर वाहन कायद्यातील सर्व नियमांची तपासणी मोटर वाहन निरीक्षक करतील. त्यानंतर संबंधित वाहन मालकावर कारवाई करण्यात येईल.
– डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
आग लागलेली ही गाडी एंजल मिकी मिनी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची होती. या गाड्या खासगी ठेकेदाराच्या आहेत, शाळेचा यांच्याशी करार झालेला आहे, अशा एकूण सहा गाड्यामार्फत विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ही आग लागली.
– पंकज भारती, ट्रान्सपोर्ट विभागप्रमुख, एंजल मिकी मिनी शाळा, हडपसर