पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल शनिवारी (दि. 29) जाहीर करण्यात आला. ही परीक्षा 12 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. पाचवीचे 22.16 टक्के, तर आठवीचे 15.60 टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या वतीने देण्यात आली.
या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना शनिवारपासून आपला निकाल परिषदेची अधिकृत वेबसाइटwww. mscepune. in आणि https:// www. mscepuppss. in वर पाहता येणार आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगिनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल वेबसाइटवर पाहता येईल. गुणपडताळणी करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये 29 एप्रिल ते 9 मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. तसेच, गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता 50 रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाइन पेमेंटद्वारे भरावी लागणार आहे.
विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी/ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी 9 मेपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. दिलेल्या मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. दिलेल्या मुदतीत ऑनलाइन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
दृष्टिक्षेपात शिष्यवृत्ती परीक्षा
नोंदविलेले परीक्षार्थी
पाचवी- 5,32,876
आठवी – 3,67,802
पात्र परीक्षार्थी
पाचवी-1,13,938
आठवी – 55,557
उपस्थित परीक्षार्थी
पाचवी- 5,14,131
आठवी – 3,56,032
अपात्र परीक्षार्थी
पाचवी- 4,00,193
आठवी – 3,00,475
पात्रतेची टक्केवारी
पाचवी- 22.16 आठवी- 15.60