अकरावी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा

अकरावी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, अर्ज भाग १ भरण्यास २५ मे रोजी सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे. दहावीचा निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांना भाग १ भरता येईल. तर, दहावीच्या निकालानंतर अर्जाचा भाग २ भरण्यास सुरुवात होईल. यानंतर प्रवेशाच्या तीन नियमित फेऱ्या, दोन विशेष फेऱ्या होणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य फेरी या वर्षी होणार नाही.

माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख आणि संभाव्य प्रवेशाचे टप्पे जाहीर करण्यात आले. विभागाकडून मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका प्रवेश क्षेत्रांसाठी अकरावी प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता लक्षात घेऊन अकरावी प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

२० मे ते दहावीच्या निकालापर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करता येणार आहे. दहावीच्या निकालनंतर विद्यार्थ्यांना पसंतीची महाविद्यालये आणि अर्जाचा भाग २ भरता येईल. कोटांतर्गत राखीव जागेवरील प्रवेशप्रक्रिया दहावीच्या निकालानंतर सुरू होईल. यानंतर पहिली नियमित फेरी साधारण १० ते १५ दिवस सुरू राहील. दुसरी व तिसरी नियमित फेरी ७ ते ९ दिवस सुरू राहील. पहिली विशेष फेरी ७ ते ८ दिवस सुरू राहील. ए.टी.के.टी सवलतीसह असणारी दुसरी विशेष फेरी एक आठवडा सुरू राहील. रिक्त जागांचा विचार करून गरजेनुसार विशेष फेऱ्या घेण्यात येतील. तसेच, याबाबत सविस्तर वेळापत्रकदेखील जाहीर केले जाईल. ऑगस्ट अखेरीस प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे माध्यमिक शिक्षण संचालकांकडून कळविण्यात आले आहे.

महत्त्वाच्या तारखा

विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज दोन भागांत भरायचा आहे. भाग १ भरण्यास २५ मेपासून सुरुवात होणार आहे. तर, भाग २ हा दहावीच्या निकालानंतर भरता येईल. सर्वप्रथम विद्यार्थी, पालक, कनिष्ठ महाविद्यालये यांचे उद्धोधन, प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. २० ते २४ मे या कालावधीत विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग १ भरण्याबाबत सराव करण्यासाठी मुदत असेल. विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग १ भरताना तो दोन दिवसांच्या मुदतीत तपासून घ्यावा लागणार आहे.

logo
Pudhari News
pudhari.news