Rajasthan Election : 94 वर्षीय कार्यकर्त्याला पाहिले, अन् मोदींच्या भाषणाचा नूरच पालटला

Rajasthan Election : 94 वर्षीय कार्यकर्त्याला पाहिले, अन् मोदींच्या भाषणाचा नूरच पालटला
Published on
Updated on

जयपूर, वृत्तसंस्था : राजस्थान विधानसभा (Rajasthan Election) निवडणुकीतील सर्वच प्रचारसभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा रोख एक-दोन स्थानिक मुद्दे वगळता सारखाच होता. आपण केलेल्या आणि करणार असलेल्या कामाचा आढावा, काँग्रेसवर हल्लाबोल असेच साधारणपणे सर्व भाषणांचे स्वरूप होते. राजसमंद जिल्ह्यातील देवगड येथील सभा मात्र आगळी ठरली. या निवडणुकीतील मोदींची ही शेवटची प्रचारसभा होती, हे विशेष!

श्रोत्यांमध्ये पुढच्या रांगेत व्हिलचेअरवर बसलेले 94 वर्षांचे संघ, भाजप कार्यकर्ते धर्मचंद देरासरिया यांच्यावर पंतप्रधान मोदींची नजर गेली आणि देवगडच्या सभेचा नूरच पालटला.

मोदींनी देरासिया यांना मंचावरूनच प्रणाम केला… आणि म्हणाले… मोदींच्या नावाने सकाळ-सायंकाळ जे भ्रष्ट, देशविघातक लोक शंख करतात, त्यांना भाजपची ताकदच माहिती नाही… हे असे संपूर्ण समर्पित कार्यकर्ते केवळ भाजपकडे आहेत, असे जनसमुदायाला सांगताना पंतप्रधानांचे बोट आणि द़ृष्टी देरासरियांकडे सारखी रोखलेली होती. मोदींचे अवघे भाषण पुढे कार्यकर्ता केंद्रित ठरले. पंतप्रधान या भाषणात अनेकदा भावुक झाले. अनेकदा आवाजात कंपने आली आणि अनेकदा डोळ्यांतून पाणीही तरळले.

मोदी म्हणाले, मोदींना शिव्या दिल्या म्हणजे आपले सारे चालून जाईल आणि भाजप संपून जाईल, असे या ज्या लोकांना वाटते, ते मुर्खांच्या नंदनवनात राहातात. देरासरियांसारख्या लक्षावधी कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने आणि घामाने भाजपला घडविले आहे. 'भारतमाता की जय' हे एकमेव स्वप्न उराशी बांधून या पक्षासाठी चार-चार पिढ्या खपलेल्या आहेत. देशाला पहिले प्राधान्य देणे, हाच या कार्यकर्त्यांचा पुरुषार्थ आहे, त्याला मी प्रणाम करतो.

श्रद्धेय देरासरियांना पहा… आयुष्याची 7 दशके त्यांनी प्रखर राष्ट्रवादाचा हा विचार सत्तेत यावा म्हणून खपविली आहेत… आणि याउपर एक कार्यकर्ता म्हणून श्रोत्यांमध्ये बसून आम्हाला ते आशीर्वाद देत आहेत. देरासरिया यांचा आशीर्वाद मिळाला आणि माझ्या या शेवटच्या प्रचारसभेने जणू संपूर्ण निवडणूक मोहिमेचेच चीज झालेले आहे, असे मोदी म्हणाले आणि त्यांनी पुन्हा एकदा देरासरियांना प्रणाम केला.

कोण आहेत देरासरिया? (Rajasthan Election)

देरासरिया यांनी सातत्याने रा. स्व. संघ, जनसंघ, भाजपचे काम केले. कारावासही भोगला. प्रकृती ठीक नसतानाही मोदींच्या सभेला जायचेच, असा हट्ट त्यांनी धरला होता. म्हणून मग त्यांना व्हिलचेअरवरून आणले गेले होते. देरासरियांना 4 मुले आहेत.

देरासरियांचे मुंबई कनेक्शन 

देरासरिया यांचे तिसरे पुत्र आझाद देरासरिया हे मुंबईतील रहिवासी असून, धातूचा व्यवसाय करतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news