Hatkanangle Lok Sabha: पक्षाकडून निरोप आल्यास हातकणंगले लोकसभा ताकदीने लढणार: सत्यजीत पाटील

सत्यजित पाटील सरूडकर
सत्यजित पाटील सरूडकर


सरुड:
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून 'मविआ'कडून लढण्यासाठी माजी आमदार सत्यजीत पाटील-सरूडकर यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. पक्षाकडून विचारणा झाल्यावर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तसे याआधीच कळविले आहे. ठाकरे यांनी देखील उमेदवारीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. यावर पक्षाकडून रात्री अपरात्री किंबहुना केंव्हाही लढण्या बाबतचा निरोप आल्यास लोकसभा निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याचे सूतोवाच पाटील यांनी 'दै. पुढारी'शी बोलताना केले आहे. Hatkanangle Lok Sabha

तथापि, शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांमध्ये स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रति सहानुभूती व्यक्त करणारा एक विचारप्रवाह आहे. त्याला कोल्हापूरातील महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याची भक्कम साथ मिळत असल्याने मविआच्या हातकणंगलेतील उमेदवारीचे सूप तळ्यात मळ्यात वाजताना दिसते, ही वस्तुस्थिती आहे. साहजिकच राजू शेट्टी यांचा 'एकला चलो रे' आत्मविश्वास दुणावत चालला आहे. चर्चित शक्तीपीठ मार्गातील भूसंपादनाच्या मुद्द्यावरून टीकेचे बाण सोडून महाविकास आघाडीला घायाळ करणाऱ्या राजू शेट्टी यांना लोकसभा निवडणुकीत त्याच मविआचा बाहेरून पाठिंबा हवा आहे. त्यांचा हा दुटप्पीपणा मविआच्या दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेते आणि कार्यकर्त्यांना रुचताना दिसत नाही. Hatkanangle Lok Sabha

शेट्टी हे मविआसाठी सद्याचे निवडणुकीचे चांगले वातावरण खराब करीत आहेत, असे या कार्यकर्त्यांना वाटते. त्याचवेळी याआधीही एका निवडणुकीनंतर शिवसेनेला शेट्टींचा वाईट अनुभव आल्याची स्थानिक शिवसैनिकांमध्ये सुप्त खदखद आहे. मात्र, वरिष्ठांच्या तंबीमुळे किंबहुना शेट्टींवरील एकतर्फी प्रेमामुळे या असंतोषाला मोकळी वाट मिळालेली नाही. हेही तितकेच खरे आहे.

याचाच परिपाक म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे 'साहेब ! निष्ठवंताला उमेदवारी द्या, आम्ही रक्ताचे पाणी करून आपला उमेदवार निवडून आणू!' अशी आग्रही मागणी हातकणंगले मतदारसंघातले शिवसैनिक करताना दिसतात. दरम्यान, दुखावलेल्या 'मविआ' नेत्यांमध्ये राजू शेट्टी यांच्याबाबत अविश्वासाची भावना निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा आघाडीत तातडीच्या बैठकीचा सिलसिला सुरू झाला आहे.

यातूनच हातकणंगलेची निवडणूक 'मशाल' चिन्हावर लढण्याच्या मुद्द्याने उचल खाल्ली आहे. नव्याने चर्चेत गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी कोल्हापूर सोडून इतरत्र लढण्यास नकार दिल्याने शाहूवाडीचे माजी आ. सत्यजित पाटील यांना उमेदवारीची गळ घातली जाण्याची शक्यता बाळावल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर पाटील यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता, 'हातकणंगलेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडे प्रबळ उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे मीही याआधीच सकारात्मकता कळवली आहे. यावर 'मविआ'मध्ये एकमत झाल्यास आणि पक्षाकडून रात्री अपरात्री, केंव्हाही लढण्याबाबतचा निरोप आल्यास लोकसभा निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याचे स्पष्ट सूतोवाच केले आहे.

Hatkanangle Lok Sabha … तर असे असेल बेरजेचे समीकरण

शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात सरूडकर यांचा मोठा जनसंपर्क आहे. तर शिराळा मतदारसंघातून आ. मानसिंगराव नाईक, माजी आ. शिवाजीराव नाईक आणि वाळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मोठी मदत मिळू शकते. हातकणंगलेतून माजी मंत्री आ. सतेज पाटील यांच्याबरोबरच माजी आ. डॉ. मिणचेकर आणि आ. राजूबाबा आवळे यांची संयुक्त ताकद उभी राहिल. तेच कमीअधिक प्रमाणातील चित्र शिरोळ आणि इचलकरंजीत पाहायला मिळण्याची शिवसैनिकांना आशा वाटते. या दृश्य समीकरणामुळेच पुढील एक दोन दिवसांत सत्यजित पाटील यांच्या नावावर 'मविआ'कडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news