सातारा : जिल्ह्यातील 65 महसूल मंडलात दुष्काळ

सातारा : जिल्ह्यातील 65 महसूल मंडलात दुष्काळ

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या 8 तालुक्यांतील 65 महसुली मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या महसुली मंडलांतील दुष्काळग्रस्तांना सर्व सवलती लागू होणार आहेत. वाई, खंडाळा तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उर्वरित तालुक्यांच्या दुष्काळी परिस्थितीकडे दै. 'पुढारी'ने लक्ष वेधले होते. त्याची दखल राज्य शासनाने घेतली आणि दुष्काळसदृश तालुक्यांची यादी शासनाने जाहीर केली.

जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. राज्य शासनाने जिल्ह्यातील वाई तसेच खंडाळा तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. मात्र जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांतील दुष्काळाकडे दै. 'पुढारी'ने लक्ष वेधले. त्यानंतर लोकप्रतिनिधींनीही या पद्धतीवर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर मुंंबईत मंत्रालयातील वॉर रूम येथे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभाग व मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील दुष्काळसदृश तालुके व महसूल मंडले जाहीर करण्यात आली.

जिल्ह्यातील 8 तालुक्यात 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या 65 महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या महसुली मंडलातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार्‍या सर्व सवलती लागू होणार आहेत. 65 महसुली मंडलांमध्ये 75 टक्क्यांपेक्षा कमी आणि 750 मिमी पेक्षा कमी पाऊस पडल्याचा निष्कर्ष घेऊन जिल्ह्यातील सातारा, फलटण, कोरेगाव, माण, खटाव, कराड, पाटण
आणि जावली तालुक्यातील कमी पर्जन्य झालेल्या महसूल मंडळांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील काही महसूल मंडलांमध्येही कमी पर्जन्यमान झाले आहे. त्याबाबत काय निर्णय होणार? याची उत्सुकता लागली आहे.
जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, फलटण, माण, खटाव, जावली, कराड, पाटण तालुक्यांमध्ये जमीन महसूलात घट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात 33.5 टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, शेती पंपाची वजी जोडणी खंडित न करणे या दुष्काळी तालुक्यांना लागू केलेल्या सवलती देण्यात येणार आहेत.

17 महसूल मंडले वगळली?

75 टक्क्यांपेक्षा जास्त व 750 मिमीपेक्षा जास्त पाऊस झालेल्या 17 महसूल मंडलांचा मात्र दुष्काळसदृश मंडलांच्या यादीत समावेश होऊ शकलेला नाही. त्यामध्ये सातारा तालुक्यातील परळी, दहिवड; जावली तालुक्यातील जावली, करहर, केळघर, बामणोली; पाटण तालुक्यातील पाटण, मोरगिरी, हेळवाक; कराड तालुक्यातील उंडाळे, महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर तसेच इतर 6 महसूल मंडलांचा समावेश आहे. या महसूल मंडलांमध्ये 75 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस आहे. त्यामुळे दुष्काळसदृश महसूल मंडलातून या 17 मंडलांना वगळण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news