कामात आडवे आला तर खल्लास करीन; आ. शिवेंद्रराजेंकडून दमदाटी

file photo
file photo

सातारा, पुढारी वृत्तसेवा : बाजार समितीच्या जागेवरून झालेल्या राडेबाजीनंतर आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह 81 जणांविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. माझ्या शेतजमीनमध्ये बेकायदेशीर जमाव जमवून मला आ. शिवेंद्रराजे यांनी 'आमच्या कामामध्ये आडवे आला तर खल्लास करीन' अशी धमकी दिली असल्याची तक्रार खा. उदयनराजे समर्थक संपत महादेव जाधव (रा. संभाजीनगर, सातारा) यांनी दिली आहे. त्यानुसार नगरसेवक, सरपंच यांच्यासह राजकीय पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

आ. शिवेंद्रराजे भोसले, विक्रम पवार, मधुकर पवार, आनंदराव कणसे, अरुण कापसे, अमीन कच्छी, विजय पोतेकर, रमेश चव्हाण, राजेंद्र नलावडे, वंदना कणसे, शैलेंद्र आवळे, संजय पवार, अनिल जाधव, धनाजी जाधव, महेश गाडे, धर्मराज घोरपडे, नामदेव सावंत, फिरोज पठाण, रवी ढोणे, कांचन साळुंखे, अविनाश कदम, रवी पवार, शेखर मोरे, दादा जाधव, निलेश पवार, बाळासाहेब पिसाळ, सुनील झंवर, नंदकुमार गुरसाळे, उत्तम नावडकर, अमित महिपाल, अमर मोरे, मिलिंद कदम, सुजीत पवार, शैलेश देसाई, पद्मसिंह खडतरे, गणेश साबळे, प्रवीण शिंगटे, अरविंद जगताप, सूरज जांभळे, प्रतीक शिंदे, सागर साळुंखे, राहूल शिंदे, कुणाल मोरे, सुनील निकम, चेतन सोलंकी, अन्सार अत्तार, साईराज कदम, दीपक शिंदे, अभय जगताप (सर्व रा.सातारा शहर परिसर) व इतर 30 अनोळखी अशा एकूण 81 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार संपत जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मी स्वत: शेतकरी आहे. खिंडवाडी ता. सातारा येथे सव्हें नंबर 6/3, 6/4/1, 6/4/1/अ, 6/4/1 ब, 6/4/2 ही शेत जमीन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या मालकीची असून त्यामध्ये ते पिढ्यानपिढ्याचा कुळवहिवाट शेतकरी आहेत. सध्या माझ्या वहीवाटातील शेत जमिनीमध्ये नांगरणी केली आहे. दि. 21 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता शेत जमिनीतील सर्व्हे नं. 6/3 आणि 6/4 मधील क्षेत्रामध्ये मशागतीचे काम पाहण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेस संशयित आरोपींनी माझ्या शेत जमिनीच्या क्षेत्रामध्ये बेकायदेशीर जमून अनाधिकारपणे प्रवेश केला. संशयितांमध्ये ओळखीचे अ‍ॅड. विक्रम पवार याने कुदळ, दगड आणले होते. त्यावेळी त्याने मला उद्देशून 'आम्ही येथे उदघाटन घेणार आहोत. इकडे यायचे नाही. तुला काय करायचे ते कर. आज उदघाटन होणारच', असे म्हणून शिवीगाळ केली. ही घटना मी माझा पुतण्या अ‍ॅड. सागर जाधव यास बोलावून सांगितली. त्यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी मला व पुतण्याला उद्देशून 'आमच्या कामामध्ये आडवे आला तर खल्लास करीन', अशी धमकी दिली. त्यावरुन संशयित 81 जणांविरुध्द तक्रार दिली.

अनाधिकाराने प्रवेश करुन दमबाजी..

तक्रारदार संपत जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आ.शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरुध्द भारतीय दंड संहिता 141, 143, 149, 447, 504, 506, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पाचपेक्षा अधिक लोक, बेकायदा जमाव, दमदाटी करुन धमकी, अनाधिकाराने जागेत प्रवेेश असा या कलमांचा अर्थ आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news