‘दै. पुढारी’ तर्फे आज संतवाणी कार्यक्रमाचे आयोजन

‘दै. पुढारी’ तर्फे आज संतवाणी कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा

मकरकुंडले तळपती श्रवणी,
कंठी कौस्तुभमणि विराजित
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने

महाराष्ट्राला आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा लाभली आहे. पंढरपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरू आहे. लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर, ग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात विठुरायाचे नामस्मरण करीत वारकरी नामस्मरणात लीन होतात. या भक्ती सोहळ्याची अनुभूती गुरुवारी (दि. 29) दैनिक 'पुढारी' प्रस्तुत संतवाणीमधून पिंपरी चिंचवड शहरवासीयांना मिळणार आहे.

संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी युवा प्रशस्ती राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी आणि सुपुत्र पंडित श्रीनिवास जोशी आषाढी एकादशीच्या प्रसन्न सायंकाळी स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या आठवणी उलगडणार आहेत. आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता 'संतवाणी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाचा सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यांतून आलेल्या वारकर्‍यांचा भक्तिमय पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल झाला आहे. आजच्या दिवशी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे तसेच इतर संतांचे अभंग सर्वांनाच आठवतात. याच संतवाणीमध्ये भिजण्याचा व न्हाऊन जाण्याचा अनुभव आज शहरवासीयांना मिळणार आहे.

पहाडी आवाजाचे व्हा साक्षीदार

महाराष्ट्रातील संतांची अभंगवाणी ही लोकप्रिय आहे. आषाढी एकादशी व अभंगवाणी हे एक अलौकिक नाते आहे. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या पहाडी आवाजाची अनुभूती त्यांचे नातू विराज जोशी यांच्या अभंग गायनातून मिळणार आहे. एकीकडे श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त वैष्णवांचा मेळा भक्तिरसात न्हात असताना शहरवासीयांना संतवाणीमध्ये भक्तिरसाची मैफल अनुभवायला मिळणार आहे. याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन दैनिक 'पुढारी' परिवारातर्फे करण्यात येत आहे.

  • ग. दि. माडगूळकर सभागृह, आकुर्डी
  • गुरुवार, दि. 29/06/2023
  • वेळ : सायं. 5.30
  • प्रवेश विनामूल्य
logo
Pudhari News
pudhari.news