कार्तिकी एकादशीनिमित्त अलंकापुरीत माऊलींचा जयघोष

कार्तिकी एकादशीनिमित्त अलंकापुरीत माऊलींचा जयघोष
Published on
Updated on

आळंदी : पुढारी वृत्तसेवा :  कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा, कार्तिकी एकादशीची पहाटपूजा पहाटे एक वाजता समाधीवर पवमान अभिषेक व दुधारती अकरा ब्रम्हवृन्दांच्या वेदघोषात झाली. यंदा माऊलींच्या पहाटपूजेचा मान हा २०२१ मध्ये मानकरी ठरलेल्या आडे दाम्पत्याला पुन्हा एकदा मिळाला. पहाट पुजेसाठी दर्शनबारी बंद केल्यानंतर दर्शनबारीत असणाऱ्या पहिल्या वारकरी दाम्पत्याला हा मान दिला जातो. आडे दाम्पत्य याचे दुसऱ्यांदा मानकरी ठरले. त्यांच्यावर माऊलीकृपा झाली, अशी भावना त्यांच्यासह सर्वात होती. शेतकरी असलेले आडे दाम्पत्य जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील परतवाडी गावचे आहे. शेषराव सोपान आडे (वय ६०) आणि गंगूबाई शेषराव आडे (वय ५५) असे या दाम्पत्याच नाव आहे.

संबंधित बातम्या :

आडे दाम्पत्य गेल्या ३० वर्षांपासून आळंदीची वारी करत आहेत. रात्री साडे बारा वाजता समाधी दर्शन बंद करण्यात आले. तदनंतर संपूर्ण मंदिर स्वच्छ करण्यात आले. बाराच्या सुमारास पासधारकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. स्वकाम सेवा मंडळ, फिनिक्स सर्व्हिसेस व इतर स्वयंसेवी संस्थांच्या वतीने मंदिरात स्वच्छता करण्यात आली. रात्री पावणे एक वाजता मुख्य महापुजा व पवमान अभिषेकास सुरुवात झाली. माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यासाठी दूध, दही, तूप, मध, साखर, आम्रखंड, सुगंधी तेल, उटणे, अत्तर यांचा वापर करण्यात आला. केशरी मेखला, शाल, तुळशीचा हार आणि डोईवर चंदेरी मुकुट ठेवून समाधीला आकर्षक रूप देण्यात आले. अकरा ब्रह्मवृंदाच्या वतीने रुद्राभिषेक करण्यात आला. दीड वाजता अभिषेक उरकल्यानंतर पूजेचा मान लाभलेल्या आडे दाम्पत्याला दर्शनाचा मान देण्यात आला. पावणे दोन वाजता धुपारती होऊन समाधीचे दर्शन खुले करण्यात आले.

यावेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त ॲड.विकास ढगे पाटील, हभप भावार्थ देखणे, योगी निरंजननाथजी, ॲड. राजेश उमाप यांच्या हस्ते मानाचे वारकरी, मानकरी आणि निमंत्रित मान्यवरांना नारळप्रसाद देण्यात आला. यावेळी प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, स्वप्नील कुऱ्हाडे, योगेश आरु, उपायुक्त संदीप डोईफोडे, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, चैतन्य महाराज लोंढे, माजी सभापती डि. डि. भोसले पाटील, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था सचिव अजित वडगावकर, माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, सागर भोसले, संजय महाराज घुंडरे, साहेबराव कुऱ्हाडे, प्रदिप बवले, रोहन कुऱ्हाडे तसेच प्रशासकीय अधिकारी, आळंदीकर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news