इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : आष्टा येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचा विद्यार्थी संकेत महादेव सरगर याने बरमिंगहॅम इंग्लंड येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळविले आहे. संकेत ने 55 किलोग्रॅम वजनी गटामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. संकेतची घरची परस्थिती बेताचीच असून त्याचे वडील सांगली येथे पानटपरी चालवितात. संकेतला महाविद्यालयाने दत्तक घेवून त्याला खेळाच्या सर्व सुविधा पुरविल्याचे प्राचार्य डाँ. राजेंद्र कुरळपकर यांनी सांगितले
प्राचार्य डॉ.राजेंद्र कुरळपकर म्हणाले, संकेत सरगरची राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड व त्याचे यश ही बाब महाविद्यालय आष्टा शहर, कासेगाव शिक्षण संस्था व राज्यासाठी अभिमानाची आहे. वेटलिफ्टिंगमध्ये निवड होणारा संकेत हा राज्यातील पहिला खेळाडू आहे. त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होती. त्याने तीन वेळा नॅशनल चॅम्पियनशिप जिंकली आहे. रेकॉर्डही केले आहेत. तसेच खेलो इंडिया इंटर यूनिवर्सिटी व खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला आहे. आजचे त्याचे यश सर्वांना अभिमानास्पद आहे. संकेतचे मूळ गाव सांगोला तालुक्यातील जिनोनी असून त्याचे कुटुंब सांगलीत स्थायिक आहे.
या यशानंतर संस्थेचे मार्गदर्शक व माजी मंत्री आ. जयंत पाटील, अध्यक्ष शामराव पाटील, सचिव प्राचार्य आर. डी.सावंत, युवा नेते प्रतीक पाटील, संस्थेचे सहसचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र कुळपकर, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. आक्रम मुजावर सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
हेही वाचा :