खरसुंडी ःपुढारी वृत्तसेवा येथील श्री सिद्धनाथ यात्रेचा बुधवारी मुख्य दिवस आहे. देवाचा पालखी सोहळा व मिरवणुकीची जय्यत तयारी झाली आहे. या सोहळ्यानिमित्त येणार्या भाविकांच्या स्वागतासाठी नाथनगरी खरसुंडी सज्ज झाली आहे. मंगळवारी यात्रा तळावर पावसाने हजेरी लावल्याने यात्रेकरुंची मोठी तारांबळ उडाली. मात्र यात्रेकरुंचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले.
परंपरेनुसार चैत्र वद्य द्वादशीच्या रात्री धावडवाडी व विठ्ठलापूर येथील मानकर्यांनी मुख्य मंदिरात हजेरी लावली. त्या ठिकाणी त्यांचा मानपान झाल्यानंतर देवाच्या लोखंडी सासनकाठ्या घोडेखूर तीर्थाकडे स्नानासाठी रवाना झाल्या. महावितरणतर्फे खरसुंडीच्या मुख्य पेठेत सासनकाठ्या नाचवताना अडथळा ठरणार्या वीजवाहिन्या अंतर्गत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणार नसल्याची माहिती अभियंता विष्णू मंडले यांनी दिली. आरोग्य विभागावतीने यात्रा तळावरील पाण्याचे स्तोत्र तपासून शुद्धीकरण करण्यात आले आहेत.
मुख्य मंदिरात वैद्यकीय मदत कक्ष तयार करण्यात आला आहे. यात्रेतही फिरते आरोग्य पथक ठेवण्यात आले आहे. एस.टी. च्या जादा फेर्यांची नियोजन केल्याची माहिती आगारप्रमुख सदाशिवराव कदम यांनी दिली आहे. यात्रेनिमित्त येणार्या भाविकांना मोफत पाणी व अन्नदान करण्यासाठी स्वयंसेवी संस्था व अन्नदाते यांनी तयारी केली आहे. यात्रेत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रातळावर बॉम्ब शोधक पथक व श्वानपथक दाखल झाले आहे.