सांगली; सचिन लाड : मुडदा' पाडायचा आणि तो पुरायचा किंवा जाळायचा…ही गुन्ह्याची नवीन पद्धत सांगली, मिरजेसह जिल्ह्यात अधिकच वापरली जात आहे. गेल्या काही वर्षात दोन महिला, एक बालिका, एका तरुणाचा व दोन गुंडांचा अशाचप्रकारे खात्मा करण्यात आला. केलेला गुन्हा पचविण्यासाठी गुन्हेगारांनी उचलेले टोकाचे पाऊल खूपच धक्कादायक आहे. नव-नवीन गुन्ह्याच्या या पद्धतीमुळे पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. (Sangli Crime)
पत्नीबरोबर असलेल्या वादातून संजयनगर येथे आठ वर्षापूर्वी पित्याने सहा वर्षीय बालिकेचा गळा आवळला. सुटकेसमध्ये तिचा मृतदेह घालून तो थेट माधवनगर जकात नाका ते रेल्वे फाटक रस्त्याकडे जाणार्या मार्गारील एका शेतात घेऊन गेला. तिथे खड्डा खोदून त्याने मृत मुलीला पुरले. मुलगी घरात नसल्याने तिच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार केली. संशयावरून पतीला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देऊन पोलिसांसमोर थेट लोटांगणच घातले होते. संपूर्ण शेतात खोदकाम केल्यानंतर मुलीचा मृतदेह सापडला होता.
मध्य प्रदेशमधील साध्वी मयुरी जैन हिला तिच्या आई, वडिलांनी इनाम-धामणी (ता. मिरज) येथे जैन बस्तीत ठेवले होते. तिने अनेकदा तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला यश आले नाही. दररोज दिसणारी मयुरी जैन कुठेच दिसेना. गावातील लोकांना संशय आला. तिचा गळा आवळून खून करण्यात आला. मृतदेह रातोरात गावातील स्मशानभूमित जाळल्याची चर्चा सुरू झाली. सांगली ग्रामीण पोलिसांना निनावी पत्र आले. तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी तपास सुरू ठेवला. पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुरावे काहीच न मिळाल्याने पुराव्याअभावी संशयितांची निर्दोष मुक्तता झाली.
येथील गवळी गल्लीतील मिंच्या गवळी याचा समडोळी रस्त्यावर रात्रीच्यावेळी खून केला. याच ठिकाणी लाकडे आणून त्याचा मृतदेह जाळला. राख शांत होईपर्यंत संशयित तिथेच बसूृन होते. सकाळच्यावेळी राख व हाडे गोळा करून ती बायपास रस्त्यावरील कृष्णा नदीत फेकून दिली होती. हा खून उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. नदीत दोन-तीन दिवस पोलिसांनी शोध घेतला, पण राख व हाडे सापडलीच नाहीत.
दोन महिन्यापूर्वी बावची (ता. वाळवा) येथील ओंकार रकटे याचा किरकोळ वादातून खून झाला. त्याच्या तीन मित्रांनी गांजाच्या नशेत कारमध्ये गळा आवळला. प्रकरण अंगलट येऊन नये, यासाठी संशयितांनी लाकडे खरेदी करून आष्टा येथील स्मशानभूमित त्याचा मृतदेह जाळला होता. त्याची हाडे व राख नदीत फेकून दिली होती. अवघ्या 24 तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला, मात्र हाडे व राख सापडली नाहीत.
सांगलीतील अहिल्यानगर येथील गौरी गोसावी या महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून पुतण्याने साथीदाराच्या मदतीने खून केला. खून करण्यासाठी त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले होते. सलगरे (ता. मिरज) येथील जंगलात गौरी यांना नेले. चाकूने सपासप वार करून गौरी यांचा खून केला. त्यांचा मृतदेह पुरला. तत्पूर्वी पुतण्याने आदल्यादिवशीच जंगलाच जाऊन खड्डा खोदला
होता.
सांगली शहर पोलिस ठाण्यातील बहुचर्चित अनिकेत कोथळे खून प्रकरणात पोलिसच गुन्हेगार बनले. अनिकेतला उलटा टांगून बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी सहा पोलिसांनी त्याचा मृतहेल आंबोली घाटात नेऊन जाळला होता. राज्यभर हे प्रकरण गाजले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. सुनावणी सुरू असताना एका पोलिसांचा कारागृहात मृत्यू झाला आहे. (Sangli Crime)