सांगली : शरीफ हसनसाब गनवार… 34 वर्षांचा होतकरू तरुण… मूळचा विजापूरचा… पत्नी आणि तीन मुलांचा सांभाळ करीत जगत होता. नातेवाईकांसोबत सेंट्रिंग व जमीन विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. याच नात्यातील महिलेशी त्याचे 'नाजूक' संबंध असल्याचा संशय त्याच्या जिवावर बेतला. अमानुषपणे नातेवाईकांनी त्याचा खून केला.
डिझेल ओतून जाळले!
चार दिवसांपूर्वी नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील घाटात अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला होता. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, हवालदार संदीप नलवडे, बिरोबा नवळे, सागर लवटे, संदीप गुरव व विक्रम खोत यांच्या पथकाने कर्नाटकात जाऊन मुळापर्यंत तपास केला. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटली. तीन संशयितांच्या मुसक्याही पथकाने आवळल्या. मृत व्यक्ती शरीफ गनवार असल्याचे निष्पन्न झाले.
दोनवेळा दिली ताकीद!
शरीफच्या खूनप्रकरणी तिघांना अटक केली आहे. यातील एका संशयिताच्या नातेवाईक महिलेशी शरीफचे 'नाजूक' संबंध होते, असा
त्यांना संशय होता. संशयितांनी शरीफला दोनवेळा ताकीद दिली होती. शरीफही बाजूला सरला होता. त्यांच्यासोबत तो व्यवसाय करीत होता. तरीही संशयित नातेवाईक त्याच्यावर चिडून होता.
'तो' दिवस ठरला अखेरचा!
संशयितांपैकी एकाचे वडील आजारी असल्याने विजापूर येथील रुग्णालयात औषधोपचार घेत होते. त्यांना पाहण्यासाठी सायंकाळी सात वाजता शरीफ गेला होता. तिथे संशयित चौघेही होते. वडिलांना पाहिल्यानंतर शरीफ, मी जातो घरी, असे सांगून निघत होता. तेवढ्यात संशयितांनी 'अरे शरीफ, चहा पिऊया, थोडी खीर शिल्लक आहे, आपण खाऊया', असे त्याला सांगितले. शरीफनेही होकार दिला. रुग्णालयाबाहेर आल्यानंतर सर्वांनी चहा पिला. त्यानंतर चौघांनी शरीफला सोलापूर रस्त्यावर थोडं काम आहे, असे सांगून त्याला कारमध्ये बसवले. विजापुरातून सोलापूर रस्त्यावर 50 किलोमीटर अंतरावर निर्जन ठिकाणी नेले.
'खीर' देऊन आवळला गळा !
निर्जन ठिकाणी संशयितांनी शरीफला खीर खायला दिली. खीर खाताच पाठीमागे बसलेल्या दोन संशयितांनी शरीफचा गळा आवळला. तो तडफडत होता. पण त्याचा जीव जाईना. त्यावेळी कारच्या पुढे चालक बाजूला बसलेल्या संशयितांनी छातीत चाकूचा वर्मी घाव घातला. काही क्षणातच शरीफ रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मरण पावला.
मृतदेह फेकायला महाराष्ट्रात!
कर्नाटक पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी संशयितांनी शरीफचा मृतदेह कर्नाटकात फेकण्याचा निर्णय घेतला. रात्री साडेअकरा वाजता ते मृतदेह घेऊन निघाले. वाटेत कारमधील डिझेल संपले. एका पंपावरून त्यांनी डिझेल खरेदी केले. कारमध्ये डिझेल टाकलेच; शिवाय शरीफचा मृतदेह जाळण्यासाठी आणखी पाच लिटर डिझेल घेतले.
अडीचला आले घाटात!
संशयित शरीफचा मृतदेह घेऊन रात्री अडीच वाजता नागज घाटात आले. कारमधून मृतदेह बाहेर काढला. अंगावर डिझेल ओतून आग लावली. थोडा वेळ ते थांबले. मृतदेह ओळखता येणार नाही, अशी पक्की खात्री पटल्यानंतर ते निघून गेले.
सोशल मीडियावर मृतदेहाचे छायाचित्र
सांगली पोलिसांनी मृत शरीफच्या मृतदेहाचे छायाचित्र व अन्य माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध केली होती. तांत्रिक मुद्यावरही तपासाला 'दिशा' दिली. अत्यंत गुंतागुंत व आव्हानात्मक ठरलेल्या या गुन्ह्याचा छडा लावण्यात अखेर यश आले. संशयितांना जेरबंदही केले.