Sana Khan Murder : मध्यप्रदेशातील आमदाराची नागपुरात होणार चौकशी

Sana Khan Murder : मध्यप्रदेशातील आमदाराची नागपुरात होणार चौकशी

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या नेत्या सना खान यांचे हत्याकांड दररोज वेगळे वळण घेताना दिसत आहे. आरोपी अमित साहूने सना खान यांचा स्वतःच्या राजकीय व आर्थिक लाभासाठी वापर केला. दरम्यान, तिच्या मोबाईलमध्ये पन्नासवर आक्षेपार्ह फोटो, क्लिपमध्ये अनेक बड्या व्यक्ती, राजकारणी, व्यापाऱ्यांचे 'राज' असल्याचे उघड झाल्यापासून अनेकांची झोप उडाली आहे.

सना हत्याकांडानंतर अमित कुठे-कुठे गेला, त्याला कुणी आश्रय दिला. यावर पोलिसांची नजर आहे. मध्यप्रदेशातील आमदारांनी अमितला आश्रय दिल्याचे बोलले जात आहे. याचसंदर्भात  नरसिंहपूरचे आमदार संजय शर्मा यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे. ते बुधवारी (दि.२२) या प्रकरणी चौकशीसाठी नागपुरात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.

दुसरीकडे हत्येनंतर सनाचा मृतदेह कारने हिरन नदीत नेऊन फेकला, असे आरोपी सांगत असला तरी तो दिशाभूल करीत असल्याने अजूनही सनाचा मृतदेह सापडलेला नाही. सनाचे तीन मोबाईल बेपत्ता आहेत. अमितने पुरावे नष्ट करण्यासाठी स्वतःचे दोन फोन आपल्या धर्मेंद्र यादव नावाच्या मित्राकडे दिले. तर त्याने ते कमलेश पटेलकडे दिले. दरम्यान, दोन मोबाईल नर्मदा नदीत फेकले, तर एक विहिरीजवळ लपविला, असे आरोपीने सांगितले असले तरी नागपूर पोलिसांची वेगवेगळी पथके यात ठोस पुरावे गोळा करीत आहेत.

सापडलेला मृतदेह सनाचा नसल्याचे कुटुंबातील सदस्यांनी सांगितल्यानंतर डीएनए सॅम्पल्स नव्याने घेतले जात आहेत. ते मुलगा आणि आईशी मॅच करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सनाचा वापर वाममार्गाने केला गेला. तिचा मारेकरी तथाकथित पती अमित उर्फ पप्पू साहू हा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील अनेक राजकीय नेत्यांकडे आणि पदाधिकाऱ्यांकडे पाठवत होता. त्यांच्या चित्रफिती आणि अश्लील छायाचित्र काढून त्याचा वापर व्यक्तीगत स्वार्थासाठी करीत होता. आतापर्यंत पोलिसांनी अमितसह पाच जणांना अटक केली आहे.

धर्मेंद्रचे वडील रविशंकर यादव यांचाही यात समावेश आहे. आरोपीला मदत करणे, हत्येनंतर आश्रय देणे, यात कोणकोण सहभागी होते, याचा खुलासा आता पोलिसांनी जप्त केलेल्या अमितच्या मोबाईलचा डाटा  हाती लागल्यावर होणार आहे. नागपुरातीलही काही लोकही पोलीस तपासात रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news