साईनामाने शिर्डीनगरी दुमदुमली; शेकडो पालख्यांचे साईनगरीत आगमन

साईनामाने शिर्डीनगरी दुमदुमली; शेकडो पालख्यांचे साईनगरीत आगमन

शिर्डी; पुढारी वृत्तसेवा : शिर्डीत 112 व्या रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी साईभक्तांनी एकच गर्दी केली, तर शिर्डीनगरीत जागोजागी 'ओम साई, जय साईं'च्या जयघोषात साई चरणी भाविक नतमस्तक होत होते. पहाटेच्या काकड आरतीनंतर गुरुवारी (दि. 30) साई भक्तांनी दर्शन बारी फुल्ल झाली होती. त्यामुळे शिर्डीत रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी भाविकांची एकच मांदियाळी पाहावयास मिळाली. साईबाबा हयातीत असल्यापासून रामनवमी उत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे.

यासाठी साई संस्थानही भाविकांना सोईसुविधा देण्यासाठी विशेष प्रयत्न करत असते. काल सुरू करण्यात आलेले साई सतचरित्र पारायणाची समाप्ती झाली. या पवित्र ग्रंथाची द्वारकामाईतून गुरूस्थान मार्गे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. उत्सवाच्या मुख्य दिवशी तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते पादुका पूजन करण्यात आले. द्वारकामाई येथील गव्हाच्या पोत्यांची पूजा करण्यात आली. त्याचप्रमाणे लेंडी बागेतील समाधी शताब्दी ध्वजाचे पूजनही करण्यात आले.

तसेच साईमंदिरात येणार्‍या भाविकांना मोफत बुंदी प्रसाद या सेवेचीही सुरवात करण्यात आली. बाबांच्या मंगलस्नानासाठी आलेल्या कावडीचेही स्वागत व पूजन करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी मालती यार्लगड्डा, राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सदस्य सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, मीनाक्षी सालीमठ, दिलीप उगले, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, आण्णासाहेब परदेशी आदीसह अधिकारी उपस्थित होते. राम जन्माचा पाळणा उपस्थित मान्यवरांनी हलवला.

शिर्डीत विविध प्रांतातील पालख्या दाखल झाल्या होत्या. त्या पालख्यापैकी 500 खोल्या सामोर अरुण जानी, सोमनाथ जानी, कोते गल्लीत माजी नगरसेवक तुषार गोंदकर, दोन नंबर गेट समोर मच्छिंद्र शेळके, साईनाथ मंगल कार्यालयाजवळ ज्ञानदेव गोंदकर व साई भगवती प्रतिष्ठान बाबा अय्यर, मनोज वाघ, प्रदीप बाफना यांनी अन्नदान व शीतपेये सुरू ठेवले होते. साई भक्तां गर्दीसमवेत अन्नदानाचे काम सुरू होते. साई मंदिराची पुष्प सजावट ही अमेरिका येथे स्थित दानशूर भक्त श्रीमती शोभा पै यांच्या देणगीतून करण्यात आली.

हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक
शिर्डीत गोपाळराव गुंड यांच्या पुढाकाराने सुरू झालेला उरूस 1912 पासून साईबाबांच्या सूचनेनुसार रामनवमी उत्सवाबरोबरच भव्य पद्धतीने साजरा होऊ लागला. उरूस आणि रामनवमी एकत्र म्हणून, त्या वेळी अहमदनगरचे दामू अण्णा रासने आणि नानासाहेब निमोणकर यांनी आणलेल्या हिरव्या आणि भगव्या अशा दोन्ही निशाणांची मिरवणूक काढून द्वारकामाईच्या दोन कोपर्‍यांवर लावले. या दोन भक्तांच्या वंशजांनी ही परंपरा आजही सुरू ठेवली आहे. ती हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news