१९८४ ची लोकसभा निवडणूक ही इंदिरा लाटेमुळे तशी एकतर्फीच झाली. ३१ ऑक्टोबर, १९८४ ला इंदिरा गांधी यांची त्यांच्याच सुरक्षा रक्षकाने हत्या केल्यानंतर काँग्रेसच्या बाजूने सहानूभुतीची लाट निर्माण झाली आणि त्याचा फायदा काँग्रेसने उचलला. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या या निवडणुकीत काँग्रेसला ५१४ पैकी ४०४ जागा मिळाल्या. या निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी ४३ जागा काँग्रेसने जिंकल्या.
राजापुरातून जनता पक्षाचे नेते मधू दंडवते, दक्षिण मुंबईतून कामगार नेते दता सांमत, कुलाब्यातून शेकापचे डी. बी. पाटील, बारामतीमधून तत्कालिन शरद पवार व संभाजीनगरातून पवार यांचे निष्ठावंत सहकारी साहेबराव पाटील डोणगावकर हे निवडून आले. मराठवाड्यातील अन्य सात मतदारसंघात काँग्रेस उमेदवार निवडून आलेले असताना छत्रपती संभाजीनगरच्या मतदारांनी शरद पवारांच्या बाजूने कौल देत भल्याभल्यांनाही चकीत केले.
डोणगावकर यांनी काँग्रेस उमेदवार आणि मंत्री अब्दुल अजीम यांचा ९२ हजार मतांनी पराभव केला होता. डोणगावकर हे निवडून येण्यामागे हिंदू- मुस्लिम मतांची विभागणी हा घटक होता. यापूर्वी डॉ. रफीक झकेरिया, काझी सलीम यांचे नेतृत्व शहरवासियांनी अनुभवले होते. अमानुल्ला मोतीवाला, अब्दूल अजीम यांनी शहराचे आमदार म्हणून काम केले होते. त्याचा वेगळा परिणात होत हिंदूंची काही मते डोणगावकरांना बर्यापैकी पडली.
१९८४ मध्ये हाजी मस्तान आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ स्थापन केला होता. मुंबईचा डॉन अशी हाजी मस्तानची ओळख. आणीबाणीत त्याला अटक केल्यानंतर जयप्रकाश नारायण यांच्या विचाराने मस्तान प्रभावित झाला आणि बाहेर आल्यहानंतर राजकीय पक्षाची स्थापना केली. या पक्षाचा एकमेव उमेदवार संभाजीनगरात उभा करण्यात आला होता. त्याचे नाव होते खलिल जाहेद. त्यांना चाळीस हजार मते मिळाली. जाहेद यांनी अजीम यांची मते घेतल्याने डोणगावकर यांना त्याचा फायदा झाला आणि सरपंच, जि. प. अध्यक्ष, साखर कारखान्याचा अनुभव असणारे डोणगावकर हे थेट लोकसभेत पोहचले. खलिदला उभे करण्यामागे एस काँग्रेसच्या बड्या नेत्याचा होत होता, अशी चर्चा आहे.
अण्णा या नावाने सुपरिचित असणारे डोणगावकर खासदार असताना संभाजीनगरात एस काँग्रेसचे इंदिरा काँग्रेसमध्ये विलिनीकरण झाले होते. या सोहळ्याला तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी आले होते. आमखास मैदानावर हा सोहळा झाला. गंगापूर कारखान्याचे चेअरमन असताना कृत्रिम पावसाचा प्रयोग त्यांनी केला. हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग. (त्यावेळी काही भागात झालेला पाऊस हा प्रयोगामुळे होता की नैसर्गिक यावर अजूनही वाद आहेत.) पुढे अण्णा विधानसभेला उभे राहिले, त्यात त्यांना यश आले नाही. प्रकृतीच्या कारणास्तव ते नंतर सक्रिय राजकारणापासून दूर झाले. त्यांच्या पत्नी इंदूताई या काही काळ जि. प. उपाध्यक्ष होत्या. त्यांचे पुत्र कृष्णा पाटील व सून देवयानी डोणगावकर या जिल्हा परिषदेत सक्रिय होत्या.
देवयानी यांनी जि. प. चे अध्यक्षपद सांभाळले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर डोणगावकर यांनी काँग्रेस पक्षात राहणे पसंत केले. मात्र शरद पवारांचा त्यांच्या कुटुंबाशी स्नेह कायम होता. अण्णा नेहमी म्हणत, कार्यकर्ता हा नेत्याच्या प्रेमाच्या चार शब्दांचा भुकेला असतो. त्याला बरोबरीने वागवा, सन्मानाने वागवा. त्याच्या सुखदु:खाला धावून जा. तो तिथे आहे म्हणून मी इथे मोठा झालो आहे. कार्यकर्त्याला योग्य सन्मान द्या, तोच तुम्हाला आमदार, खासदार मंत्री करीत असतो.
प्रदीर्घ आजारामुळे डोणगावकर यांचे ११ एप्रिल, २०११ रोजी निधन झाले. विशेष म्हणजे यादिवशी शरद पवार हे संभाजीनगरात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यामुळे आपल्या सहकार्याला अनपेक्षितपणे शेवटचा निरोप देताना त्यांनाही गहिवरून आले होते.