SA vs WI : 35 षटकार, 517 धावा, 2 शतके! द. आफ्रिकेचा विंडीजवर विक्रमी विजय

SA vs WI : 35 षटकार, 517 धावा, 2 शतके! द. आफ्रिकेचा विंडीजवर विक्रमी विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : SA vs WI : क्विंटन डी कॉक आणि रीझा हेंड्रिक्स यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर द. आफ्रिकेने सेंच्युरियन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 7 चेंडू आणि 6 गडी राखून पराभव केला. विंडिजच्या 258 धावांच्या प्रत्युत्तरात द. आफ्रिकेने 4 विकेटच्या मोबदल्यात 259 धावा करून रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून 517 धावांचा पाऊस पाडला. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक धावा होण्याचा हा नवा विक्रम आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर ब्रेंडन किंग बाद झाला. वेन पारनेल याने त्याची विकेट घेतली. यावेळी विंडिजची धावसंख्या अवघी 2 होती. पण यानंतर जॉन्सन चार्ल्स आणि काइल मायर्स यांनी वादळी खेळी करत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 58 चेंडूत 135 धावांची भागीदारी केली. चार्ल्सने 23 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या आणि नवव्या षटकात संघाला 100 पर्यंत नेले. मायर्सने 27 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांसह 51 धावांची खेळी केली. तो मार्को जॅन्सनचा बळी ठरला. निकोलस पूरन दोन धावा करू शकला. मार्को यानसन याने त्याची विकेट घेतली. लागोपाठ दोन विकेट पडल्यानंतर विंडीज संघाचा रनरेट घसरेल असे वाटत होते, पण चार्ल्स वेगळ्याच निर्धाराने उतरला होता. त्याने 39 चेंडूंत नऊ चौकार आणि तब्बल षटकारांसह पहिले टी-20 आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. यासह त्याने वेस्ट इंडिजसाठी सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रमही केला. (SA vs WI)

शतक पूर्ण केल्यानंतर 14 व्या षटकात चार्ल्स बाद झाला. यानसनने त्याला बोल्ड केले. कर्णधार रोव्हमन पॉवेल (28) आणि रोमॅरियो शेफर्ड (41) यांनी अखेरच्या सहा षटकांत 79 धावा चोपल्या. याचबरोबर संघाने 258 धावांपर्यंत मजल मारली. टी-20 मधली ही वेस्ट इंडिजची सर्वोच्च धावसंख्या ठरली. शेफर्डने आपल्या खेळीत एक चौकार आणि चार षटकार मारले. पॉवेलने 19 चेंडूत एक चौकार आणि दोन षटकार ठोकले. ओडिअन स्मिथनेही वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले आणि शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. सिसांडा मगाला हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. विंडीज फलंदाजांनी त्याच्या चार षटकात 67 धावा वसूल केल्या. द. आफ्रिकेकडून मार्को जॅनसेनने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर वेन पारनेलने 2 बळी मिळाले. (SA vs WI)

डिकॉक-हेड्रिंक्सने विक्रम मोडले

प्रत्युत्तरात क्विंटन डिकॉक आणि रीझा हेंड्रिक्स यांनी दक्षिण आफ्रिकेला धडाकेबाज सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 65 चेंडूत 152 धावा रचल्या. यादरम्यान डिकॉकने 15 चेंडूत आपले अर्धशतक फटकावले. हे द. आफ्रिकेसाठीचे सर्वात वेगवान अर्धशतक असून संयुक्तपणे चौथे सर्वात वेगवान टी-20 अर्धशतक ठरले. डिकॉकच्या विध्वंसक अवतारामुळे पॉवरप्लेच्या सहा षटकांत द. आफ्रिकेने शतकी धावसंखेचा टप्पा पार केला. पुढच्या पाच षटकात धावगती कमी झाली. पण तरीही 10 षटकांनंतर, यजमान संघाने 149 धावांपर्यंत मजल मारली.

डिकॉकने 43 चेंडूत पहिले टी-20 आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. काही वेळातच त्याला रॅमन रेफ्रीने बाद केले. रिले रुसोने चार चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांसह 16 धावा केल्या. दरम्यान, हेंड्रिक्सनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. 193 धावांवर तो तंबूत परतला. त्याने 28 चेंडूंत 11 चौकार आणि दोन षटकारांसह 68 धावा केल्या. डेव्हिड मिलर 10 धावा करू शकला. 36 धावांत तीन विकेट गमावल्यानंतर द. आफ्रिकेची धावगती मंदावली. पण कर्णधार मार्कराम (38) आणि हेनरिक क्लासेन (16) यांनी मिळून उर्वरित धावा आरामात गोळा केल्या. मार्करामने चार चौकार आणि एक षटकार तर क्लासेनने तीन चौकार मारले. विंडीजकडून रॅमन रेफर, जेसन होल्डर, ओडियन स्मिथ आणि कर्णधार रोव्हमन पॉवेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (SA vs WI)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news