वॉशिंग्टन ; वृत्तसंस्था : रशियाशी तुम्ही साधत असलेली जवळीक तुम्हाला महागात पडेल आणि त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा अमेरिकेने भारताला दिला आहे. रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य आर्थिक सल्लागार ब्रायन डीज यांनी हा इशारा दिला आहे.
वास्तविक भारताने हे युद्ध लवकरात लवकर संपावे, रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांत शांतता नांदावी, अशी भूमिका घेतली आहे. मात्र अमेरिकेला हे मान्य नाही. डीज यांचे म्हणणे असे की, युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान यासारख्या देशांनी रशियाविरुद्ध कडक आर्थिक निर्बंध जारी केले. तथापि भारताने असे कोणतेही कडक पाऊल उचलले नाही. उलट भारताने रशियाकडून कच्चे तेल आयात आयात करणे सुरूच ठेवले.
गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार दलीप सिंग यांनी काही भारतीय अधिकार्यांसोबत या विषयावर चर्चा केली होती. त्यानंतर लगेचच डीज यांच्याकडून वरील प्रतिक्रिया आली आहे. (Russia Ukraine War)
दलीप सिंग यांनी रशियासंदर्भात भारताने घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र भारतासह अन्य सात देशांशी अमेरिका नेहमीसारखेच सहकार्य करेल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली होती. भारत हा रशियाकडून युद्धसामुग्री खरेदी करणारा सर्वांत मोठा देश आहे.