Russia-Ukraine conflict : महिलांचे महायुद्ध जगण्याशीच

Russia-Ukraine conflict : महिलांचे महायुद्ध जगण्याशीच
Published on
Updated on

रशियाच्या युक्रेनवरील (Russia-Ukraine conflict) पाशवी हल्ल्यामुळे सर्वाधिक झळ पोहोचली आहे, ती महिलांना. युक्रेनियन सरकारने पुरुषांना देश सोडण्याची परवानगी दिलेली नाही. हजारो महिला आणि मुले शेजारी देशांमध्ये आसरा शोधण्यासाठी गेले आहेत. युद्धस्थितीत स्त्रियांवर अत्याचार केले जातात. त्यांची अवहेलना केली जाते. हेच युद्ध संपल्यानंतर, उद्ध्वस्त झालेलं घर पुन्हा उभारण्याची जबाबदारीही तिच्यावरच येऊन पडते. 'जीवनाची लढाई' ही तिला नेहमीच अटीतटीने लढावी लागते.

'मिस्टर जॉन्सन, तुम्ही कीव्हला का येत नाही? तुम्हाला कीव्हला येण्याची भीती वाटते का? 'नाटो'देखील सुरक्षेसाठी तयार नाही. 'नाटो' तिसर्‍या महायुद्धाला घाबरून आहे. युक्रेनचे लोक युद्धाच्या झळा सहन करत आहेत. पण कोणाला त्याचं काहीच पडलेलं नाही…' ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यावर महिला पत्रकार डारिया कालेनियुक हिने प्रश्नांचा माराच केला. रशियाकडून खार्कोव्ह शहरावर हल्ले होत आहेत, पण 'नाटो' कोणतीही मदत न करता स्वस्थ बसले आहे, असं सांगताना डारियाला अश्रू आवरले नाहीत. रशियाच्या युक्रेनवरील पाशवी हल्ल्यामुळे सर्वाधिक झळ पोहोचली आहे, ती महिलांना.

युक्रेनियन सरकारने पुरुषांना देश सोडण्याची परवानगी दिलेली नाही. हजारो महिला आणि मुले शेजारी देशांमध्ये आसरा शोधण्यासाठी गेले आहेत. कित्येक महिला आपल्या पोटच्या मुलांना घेऊन सुरक्षित आसरा शोधत रस्त्यावर फिरत आहेत. शेजारच्या रुमानियातही रस्त्यावर स्त्रिया कुठे ना कुठे छत मिळेल, या आशेपोटी भटकत आहेत. युक्रेनमध्ये सक्तीने पुरुषांना सेनेत भरती केलं जात आहे. अनेक ठिकाणी बायकामुलांची ताटातूट होत आहे. आपल्या कुटुंबाला बसस्टॉपवर सोडण्यासाठी आलेला एक बाप पोटच्या मुलीला शेवटचा निरोप देताना भावुक झाला.

तिला गुडबाय करताना तो बाप ढसाढसा रडला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्याचं हे आक्रंदन म्हणजे युद्धाचे कोणकोणते परिणाम होऊ शकतात, याचं वास्तव चित्रच आहे. आपल्या बायकामुलांना परत आपण भेटू शकू की नाही, अशी स्थिती युक्रेनमधील अनेक कुटुंबांची झाली आहे. कारण महिला आणि मुलांना ताबडतोब देश सोडून जाण्याचं आवाहन युक्रेनच्या सरकारनेच केलं आहे. युक्रेनमधील 15 बालकांचा यापूर्वीच युद्धाच्या तडाख्यामुळे मृत्यू झाला आहे.

रशिया-युक्रेन संघर्षाच्या (Russia-Ukraine conflict) परिस्थितीने जगभरातच एक अस्वस्थता निर्माण झाली आहे. या घटनेचे दूरगामी परिणाम होणार आहेत, हे तर स्पष्टच आहे.त्यातही युद्धाचे स्त्रीजीवनावर होणारे परिणाम हे अधिक गहिरे असतात. तीस वर्षांपूर्वी जे आखाती युद्ध झाले, त्यात महिला सैनिकांचे आपल्या लहान मुलांना निरोप देतानाचे फोटो गाजले होते. अगदी काही महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानातील विमानतळावर येऊन, तिथल्या महिलांनी मनावर दगड ठेवून आपल्या बालकांना अमेरिकन सैनिकांच्या हवाली करताना सर्वांनीच पाहिलं आहे.

युद्ध कुणाला काय करायला भाग पाडेल, कोणत्या विदारक अनुभवांमधून जायला लावेल, याची अशी कल्पना याआधी कोणी कधी केली नसेल… युद्धस्थितीत स्त्रियांवर अत्याचार केले जातात. त्यांची अवहेलना केली जाते. हेच युद्ध संपल्यानंतर, उद्ध्वस्त झालेलं घर पुन्हा उभारण्याची जबाबदारीही तिच्यावरच येऊन पडते. (Russia-Ukraine conflict)

बोस्नियन महिलांवर झालेल्या अत्याचाराचे व्हिडीओ दाखवून फुशारकी मारली जात होती, असाही इतिहास आहे. रवांडामध्ये वांशिक वर्चस्ववादी प्रवृत्तीतून शेकडो स्त्रियांवर बलात्कार झाले. सुमारे चौदा वर्षांपूर्वी बलात्कार हा युद्धगुन्हा म्हणून ओळखला जाऊ लागला. परंतु, त्यासाठी निरंतर चळवळ उभारावी लागली. युद्धातील लैंगिक अत्याचाराविरोधी स्त्रियांची जागतिक परिषद 2014 साली भरली होती. शत्रूराष्ट्राविरुद्ध अंगात वीरश्री संचारावी म्हणून अमेरिकी लष्करातील जवान पोर्नोग्राफिक फिल्म बघत असल्याचे पुरावे पूर्वी समोर आले होते.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या पाहणीनुसार, 1997 मध्ये एक कोटी 70 लाख स्त्री-पुरुष आपापल्या देशांत विस्थापित झाले होते आणि 2009 पर्यंत तर ही संख्या अडीच कोटींवर गेली. यादवी युद्धं आणि अंतर्गत संघर्षांमुळे विस्थापितांची संख्या फुगली. पाकिस्तानात 2009 मध्ये तीस लाख लोक विस्थापित झाले आणि यात अर्थातच स्त्रियांची संख्या लक्षणीय होती. 31 ऑक्टोबर 2000 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीने युद्ध व सशस्त्र संघर्षांमुळे मुली-महिलांना हिंसेची झळ सोसावी लागते, या वस्तुस्थितीची दखल घेतली. देशोदेशीच्या समाजात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी म्हणून काही ठराव संमत करण्यात आले.

2010 साली 192 सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या फक्त 18 देशांनी महिला संरक्षणासाठी आणि त्यांना युद्ध संपवून शांतता निर्माण करण्याच्या प्रक्रियेत सामील करून घेण्याची बांधिलकी मान्य केली. या 18 देशांमध्ये ऑस्ट्रिया, बेल्जियम, चिली, डेन्मार्क, नॉर्वे, फिलिपाइन्स, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युगांडा, पोर्तुगाल, ब्रिटन आदींचा समावेश आहे. परंतु, प्रत्यक्षात युनोच्या या प्रयत्नांचा उपयोग काय झाला? युक्रेनची राखरांगोळी होत असताना, तिथल्या महिला व मुलांची होरपळ होत असताना, युरोपीय महासंघ व अमेरिकेने टाळ्या वाजवण्याशिवाय दुसरं काय केलं? (Russia-Ukraine conflict)

या पार्श्वभूमीवर, सध्याच्या परिस्थितीत युक्रेनमधील स्त्रियांनाही युद्धात उतरावं लागत आहे. 2015 मध्ये मिस ग्रँड युक्रेनचा किताब पटकावणारी ब्यूटीक्विन अनास्तासिया लेना हिने देशासाठी बंदूक हातात घेतली आहे. आमच्या भूमीवर कब्जा करण्याच्या इराद्याने घुसखोरी कराल, तर जीवानिशी जाल, असा इशारा तिने आपल्या पोस्टमधून दिला आहे. तिच्याप्रमाणेच युक्रेनमधल्या इतरही महिलांनी शस्त्र हाती घेतलं असून, त्यात युक्रेनच्या काही महिला खासदारांचाही समावेश आहे.

युक्रेनमधील एक महिला रशियन सैनिकांसमोर उभी आहे आणि ती त्यांना सूर्यफुलाच्या बिया देत आहे, असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 'या बिया तुमच्या खिशात ठेवा म्हणजे तुम्ही मराल तेव्हा त्या युक्रेनमध्ये फूल बनून उगवतील', असं ती महिला सैनिकांना सांगत असल्याचा दावा केला जात आहे. 'तू आमच्या देशावर कब्जा करणारा फॅसिस्ट आहेस,' असं ही जिगरबाज स्त्री म्हणते आणि जाता जाता त्याला शापही देते. (Russia-Ukraine conflict)

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी देशासाठी सर्वस्वाचा होम करण्याची तयारी दर्शवली असून, यामुळे असंख्य युक्रेनियन स्त्री-पुरुषांना प्रेरणा मिळाली आहे. युक्रेनमधील एका जोडप्याला तर लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी हातात बंदूक घ्यावी लागली. परस्परांसाठी जगण्या-मरण्याची शपथ घेणारे प्रेमिक असतात. परंतु, या युक्रेनियन जोडप्याने रशियन सैनिकांशी लढता लढता मृत्यू स्वीकारण्याचीही तयारी दर्शवली आहे.

युक्रेनमधील महिला शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेत असून, स्वसंरक्षणाचे धडेही गिरवत होत्या. 'युद्धस्य कथा रम्या' हे एक लोकप्रिय वचन आहे. मात्र राष्ट्रवादाच्या अतिरेकातून युद्धखोरी जन्माला घातली जाते. युद्धखोरीतून साम्राज्यवाद वाढतो. युद्ध आणि पौरुष्य, मर्दानगीचे जाणीवपूर्वक भरणपोषण करून वर्चस्ववादाला एक समर्थन पुरवलं जातं. यात मग स्त्रीवर अत्याचार करण्याला एक मान्यताच मिळते.

महिनोन महिने किंवा वर्षानुवर्षे युद्धं सुरू राहतात. ती लढण्यासाठी घरदार सोडून रणभूमीवर जाणार्‍या सैनिकांची लैंगिक भूक भागवण्यासाठी मग वेश्या पुरवल्या जातात. युद्धग्रस्त भागातील स्त्रिया अत्याचाराच्या वा शोषणाच्या लक्ष्य ठरतात. दक्षिण कोरियातील एका बेटावरील दोनेकशे स्त्रियांना जबरदस्तीने सैनिकांची भूक भागवण्यासाठी नेलं गेलं, असा वृत्तांत जपानमधील 'असाही सिंबून' या जगद्विख्यात वृत्तपत्रात 1992 मध्ये प्रसिद्ध झाला होता. या शोषणग्रस्त स्त्रियांचं वर्णन 'कम्फर्ट विमेन' असं करण्यात आलं होतं. 80 हजार ते दोन लाख महिलांचं लैंगिक शोषण झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि त्यामुळे जपान व कोरिया या दोन्ही देशांत परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले गेले.

दुसरीकडे, युद्धाच्या काळात स्त्रियांनी पराक्रम गाजवल्याचीही उदाहरणं आहेतच. 1971 साली भारत व पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धात आपल्या वायुदलाला मदत करून कच्छच्या स्त्रियांनी इतिहासात आपलं नाव कोरलं. त्यावेळी पाकिस्तानच्या सेबर जेट विमानांनी कच्छवर नापामसारखे अत्यंत ज्वलनशील पदार्थ असलेले बॉम्ब टाकायला सुरुवात केली.

भूज विमानतळावर बॉम्बिंग करून धावपट्टी उद्ध्वस्त केली गेली. ही धावपट्टी दुरुस्त केल्याशिवाय तेथून विमानांचे उड्डाण होऊ शकले नसते. ही धावपट्टी दुरुस्त करण्याची जबाबदारी कच्छमधील महिलांना देण्यात आली. माधापर गावच्या बांधकामकुशल अशा तीनशे महिलांनी ती स्वीकारली. हे काम करणं जोखमीचं होतं. पाककडून हवाई तळावर हल्ले होण्याचा धोका टळला नव्हता.

त्यामुळे ठराविक अंतराने धोक्याचा इशारा देणारे भोंगे वाजवले जायचे. काम सुरू असताना दरवेळी भोंगे वाजले की, त्या स्त्रिया जवळच्या बाभळीच्या झाडाखाली लपत आणि भोंगे वाजणं थांबलं की, पुन्हा काम सुरू करत. युद्धाच्या छायेत त्या स्त्रियांनी तीन दिवसांत ती धावपट्टी दुरुस्त केली. भारतीय हवाई दलाचे भूज विमानतळ प्रमुख विजय कर्णिक यांनी मागितलेल्या साहाय्यास भूजच्या स्त्रियांनी अशा प्रकारे कृतिशील प्रतिसाद देऊन, हवाई दलाला अनमोल मदत केली.

या घटनाक्रमावर 'भूज : द प्राऊड ऑफ इंडिया', हा अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त हे कलाकार असलेला चित्रपट गेल्याच वर्षी प्रदर्शित झाला होता. मला इथे आठवण होते, ती कारगिल युद्धाच्या वेळी पराक्रम गाजवणार्‍या गुंजन सक्सेना आणि श्रीदिव्या राजन या दोन महिला फायटर पायलटांची. त्या काळी महिलांना वायुसेनेत प्रवेश देण्याबद्दल आक्षेप घेतला जात असे. प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास स्त्रिया सहन करू शकणार नाहीत, असे मानले जात असे. परंतु फ्लाईट लेफ्टनंट गुंजन आणि श्रीदिव्या यांनी पाक सैन्याचा हल्ला सुरू होता, अशा ठिकाणी विमान/हेलिकॉप्टर चालवलं.

तसंच सप्लाय ड्रॉप्स आणि युद्धाच्या ठिकाणी पाक सैनिक कुठे आहेत, ते शोधण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. गुंजन व श्रीदिव्या यांचं 'चीता' हे हेलिकॉप्टर निःशस्त्र होतं. या दोन वीरांगनांनी उत्तर काश्मीरच्या धोकादायक क्षेत्रात हेलिकॉप्टर उडवलं. पाकने या विमानाच्या दिशेने रॉकेट डागलं. मृत्यू जवळून पाहणार्‍या गुंजन आणि श्रीदिव्या यांना 'कारगिल गर्ल' म्हणून ओळखलं जातं. असामान्य शौर्यासाठी त्यांना शौर्यवीर पुरस्कारही मिळाला. युद्ध आणि महिला यांच्यातील संबंधाची हीसुद्धा एक बाजू आहेच.

दुसर्‍या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी जेव्हा जर्मनीत प्रवेश केला, तेव्हा तिथे सामूहिक बलात्कार करण्यात आले. बहुसंख्य बलात्कार हे सोव्हिएत रशियाच्या फौजांनी केले होते, यावर इतिहासकारांचे एकमत आहे. 'आठ ते ऐंशी वर्षांच्या असंख्य जर्मन मुली-महिलांवर त्यावेळी अत्याचार झाले', असं 'फॉल ऑफ बर्लिन' या आपल्या पुस्तकात अँटनी बीव्हर यांनी लिहून ठेवलं आहे. गेल्या वर्षी अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या क्रूर राजवटीला विरोध करणार्‍या एका तीस वर्षीय स्त्रीला गोळ्या घालण्यात आल्या. तेव्हा तिच्या कुशीत सहा महिन्यांचं बाळ होतं, हे अस्वस्थ करणारं द़ृश्य मला अजूनही आठवतं.

युद्धकालात स्त्रियांचे हाल होतातच. पण युद्धोत्तर काळाचे परिणामही महिलांना अधिक थेटपणे सोसावे लागतात. जीवनाची लढाई ही तिला नेहमीच अटीतटीने लढावी लागते. 'जागतिक महिला दिन' साजरा करताना, पोलिस, लष्कर अशा सर्व क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणार्‍या स्त्रियांचा आपण गौरव करतो. परंतु, त्याचवेळी हे लक्षात घेतलं पाहिजे की, युद्धाच्या आगीत प्रथम भक्ष्यस्थानी पडते, ती स्त्री. म्हणूनच या युद्धखोरीविरुद्ध रशियातील स्त्रियाही पुतीन यांच्या विरोधात आपला आवाज बुलंद करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news