मॉस्को ; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर जगभरातून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा निषेध केला जात आहे. काही जणांनी त्यांची सुपारी दिल्याचीही चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुतीन यांची सुरक्षाव्यवस्था नेमकी असते कशी, याविषयी जाणून घेऊया.
ज्युदो कराटे या मार्शल आर्टमध्ये निपुण असणे, उघड्या अंगाने बर्फातून याकची सवारी, पाणबुडी चालवणे किंवा केजीबी या रशियाच्या जुन्या गुप्तचर यंत्रणेत पूर्वी कार्यरत असणे इत्यादी बाबींमुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविषयी एक रोमँटिसिझम जगभरातील लोकांमध्ये आहे.
रशियावर असलेली त्यांची पोलादी पकड आणि विरोधकांना क्रूरपणे संपविणारा नेता अशी कराल ओळखही त्यांची जगभरात आहे. स्वतः माजी गुप्तहेर असल्याने पुतीन स्वतःच्या सुरक्षेबाबत अत्यंत सतर्क असतात. शत्रूपासून बचावासाठी चार स्तरीय सुरक्षाकवचामध्ये पुतीन वावरतात. तथापि, पुतीन यांच्याविषयी जगाला तेवढीच ओळख आहे, जेवढी पुतीन यांना उघड करायची असते.
…असा असतो पुतीन यांचा बॉडीगार्ड
पुतीन यांचा बॉडीगार्ड बनण्यासाठी अनेक चाचण्यांतून जावे लागते. यात मानसशास्त्र, शारीरिक क्षमता, कडक थंडीचा सामना करणे, उष्प्यात घाम येता कामा नये अशा विविध चाचण्यांचा समावेश आहे. हे बॉडीगार्ड नेहमी बुलेटप्रूफ जॅकेट परिधान करून असतात. त्यांच्याकडे बुलेटप्रूफ ब्रीफकेस व रशियन बनावटीची 9 मि.मी. एसआर-1 वेक्टर पिस्टल असते.
बॉडीगार्डचे अधिकार
पुतीन यांचे बॉडीगार्ड स्वतःला पुतीन यांचे मस्किटियर्स म्हणवतात. यात रशियाच्या फेडरल सिक्युरिटी फोर्समधील जवानांचा समावेश असतो. या जवानांना कुठल्याही वॉरंटशिवाय एखाद्याची झडती, तपासणी, अटक, इतर सरकारी यंत्रणांना आदेश देण्याचे अधिकार आहेत.
चारस्तरीय सुरक्षाकवच
पुतीन यांच्यासोबत एक शस्त्रास्त्रांनी नटलेला असा ताफा असतो. यात एके-47, रणगाडाविरोधी ग्रेनेड लाँचर, पोर्टेबल अँटिएअरक्राफ्ट मिसाईलचा समावेश असतो. गर्दीतही पुतीन चारस्तरीय सुरक्षाकवचात वावरतात. तथापि, दिसताना केवळ त्यांचे बॉडीगार्डच सोबत दिसतात. दुसरा स्तर गर्दीत मिसळलेला असतो. तिसरा स्तर गर्दी संपते तिथे असतो. आजूबाजूला स्नायपर्सही असतात.
पुतीन यांचे बॉडीगार्ड कुठल्याही प्रकारच्या हवामानाच्या स्थितीत राहू शकतील, अशा पद्धतीने तयार केले जातात. पुतीन यांच्या परदेश दौर्यापूर्वी त्यांची पथके काही महिने आधीपासूनच दौरा असलेल्या जागांवर नजर ठेवून असतात. अत्यंत लहानात लहान वस्तूपासून ते लोकांची प्रतिक्रिया काय असेल, हवामान कसे असेल, याचीही माहिती घेतली जाते.
बॉडीगार्डला निवृत्तीनंतर मिळते नवे पद
पुतीन यांच्या बॉडीगार्डला वयाच्या पस्तीशीनंतर बदलले जाते. निवृत्तीनंतर त्यांना गव्हर्नर, मंत्री, विशेष सेवा कमांडर, प्रशासक म्हणून नवीन पदे दिली जातात. अन्नातून विष दिले जाऊ नये म्हणून एक व्यक्ती पुतीन यांचे भोजन दररोज चाखून पाहत असतो.